१० हजार फुटावरून पाण्याची व्यवस्था करून कमावली चार एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 07:53 PM2019-02-26T19:53:16+5:302019-02-26T19:54:04+5:30

यशकथा : गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

Four acres of land earned by arranging water from 10 thousand feet | १० हजार फुटावरून पाण्याची व्यवस्था करून कमावली चार एकर जमीन

१० हजार फुटावरून पाण्याची व्यवस्था करून कमावली चार एकर जमीन

Next

- हरी मोकाशे ( लातूर )

सुरुवातीला दहा वर्षे कोरडवाहू शेती केली़ परंतु ती परवडत नसल्याने राजकुमार बिरादार यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन १० हजार फूट लांब असलेल्या मांजरा नदीवरून जलवाहिनी टाकली़ शेतीत पाणी उपलब्ध झाल्याने वेगवेगळे नवनवीन प्रयोग करीत आलेल्या उत्पन्नातून चार एकर शेती कमावली आहे़ विशेष म्हणजे त्यांचा गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

लातूर जिल्ह्यातील विजयनगर (गौंडगाव) ता. देवणी येथील राजकुमार धोंडिराम बिरादार यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत़ आई, वडील, दोन भावांसह कुटुंबात १८ जण़ लहान भाऊ दशरथ यांचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले. कुटुंबास वडिलोपार्जित १६ एकर शेती़ राजकुमार बिरादार यांनी १९८५ पासून कोरडवाहू शेती करण्यास सुरुवात केली़ १० वर्षे उलटली तरी शेती उत्पन्न पोटापुरतेच निघत असे़ शेती पाण्याखाली आणल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे जाणून त्यांनी २००० मध्ये चुलत भाऊ व गावातील नातेवाईकांना सोबत घेऊन मांजरा नदीवरून १० हजार फूट लांबीची शेतापर्यंत पाईपलाईन केली़ त्या पाण्यात चुलत भाऊ व नातेवाईकांनाही हिस्सा दिला़ 

यानंतर त्यांनी ६ फुटांच्या पट्टा पद्धतीने दोन एकर ऊस लागवड केली़ एकरी ६९ टनापर्यंत उत्पादन घेतले़ त्यामुळे आर्थिक प्रगती होऊ लागली़ सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत घसरतो हे जाणून त्यांनी २०११ मध्ये नजीकच्या सात शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक एकरवर भेंडी, वांगे लागवड तर दोन एकरवर पपईची लागवड केली़ त्यांची भेंडी कुवेतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली़ जागेवरच त्यांना ३१ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता़ खर्च वगळता तीन महिन्यांत लाखाचे उत्पादन मिळाले़ तसेच पपईला दिल्ली, नागपूर, मुंबईची बाजारपेठ मिळाल्याने खर्च वगळता चार लाखांचे उत्पन्न मिळाले़

दरम्यान, पपईवर रोगराई येऊ लागल्याने त्यांनी २०१७-१८ पासून मनरेगांतर्गत एक एकरवर तुतीची लागवड केली आहे़ पंधरा दिवसांपूर्वी एक क्विंटल रेशीमची बेंगलोरच्या बाजारपेठेत विक्री झाली असून, त्यास २९ हजार रुपये असा दर मिळाल्याचे राजकुमार बिरादार यांनी सांगितले़ शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगाबरोबरच गटशेतीवर भर असल्याने त्यांना राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे़

शेतीला जोड म्हणून छोटासा दुग्ध व्यवसायही करतो, असे सांगून राजकुमार बिरादार म्हणाले, सासुरवाडीने देवणी गावरान जातीची एक वर्षाची कारवड आंदण दिली होती़ तिचा व्यवस्थित सांभाळ केल्याने आतापर्यंत तिने १८ पारड आणि २ कारवडी दिल्या आहेत़ प्रत्येक पारडास २५ हजारापर्यंत किंमत मिळाली आहे़ इतर शेतकऱ्यांनीही नवनवीनवन प्रयोग करावेत यासाठी मी प्रयत्न करतो़ त्यामुळे आजघडीला जवळपास १० शेतकरी असे प्रयत्न करीत असल्याचे बिरादार यांनी सांगितले.

Web Title: Four acres of land earned by arranging water from 10 thousand feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.