पंधरा दिवसांत होणार साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा; स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार
By आशपाक पठाण | Published: May 25, 2024 06:57 PM2024-05-25T18:57:44+5:302024-05-25T18:58:05+5:30
५२ प्रकल्पातून उद्दिष्ट : स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार
लातूर : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतून साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कामाला गती आली आहे.
लातूर तालुक्यातील धानाेरी येथील तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नाम फाउंडेशनचे विलास चामे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून शेतात टाकण्यासाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही कामे सुरु असून, याच्या माध्यमातून गाळ उपसा झाल्याने सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हा गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होऊन शेतीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
अभियानामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा : जिल्हाधिकारी
शेतजमीन सुपीक बनविणारी आणि सिंचन प्रकल्पांच्या साठवण क्षमतेत वाढ करणारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासोबत स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी प्रकल्पातील गाळ उपसा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.