लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: June 13, 2024 06:53 PM2024-06-13T18:53:33+5:302024-06-13T18:53:46+5:30
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
लातूर : बँक, सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चौघांना दोन पिस्टल, १७ जीवंत काडतुसे, एक खंजरासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी केली.
पोलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निलंगा भागात गस्तीवर होते. दरम्यान काही संशयित हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पथकाने निलंगा-हाडगा मार्गावर उभा असलेल्या संशयितावर अचानक छापा टाकला.
यावेळी वाहनासह व्यक्तीची झाडाझडती घेतली. मयुर नितीन आवचारे (वय २६), अक्षय रामदास टेकाळे (वय २१), विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी (वय ३१), निशांत राजेंद्र जगताप (वय ३१ सर्व रा. पुणे) यांना अटक केली तर शाम गायकवाड अंदाजे (वय २६, रा. बामणी ता. निलंगा) हा पळून गेला. अटकेतील टोळी ही बँक, सराफा दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दोन पिस्टल, १७ जिवंत काडतुस, एक खंजीर, एक पांढऱ्या रंगाची गाडी (एम.एच. १४ एल.जे.३१६९) आणि मिरची पावडर असे दरोडा टाकण्याचे साहित्य एकूण १३ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. पल्लेवाड, पोउपनि. संजय भोसले, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, राजेश कंचे, योगेश गायकवाड, रवी कानगुले, चालक निटुरे यांच्या पथकाने केली आहे.
खुनाच्या गुन्ह्यानंतर दोघे आरोपी झाले होते फरार...
निलंगा येथे ताब्यात घेतलेल्या आरोपीतील दोघे हे पुणे येथील मुन्ना जगताप गॅंगचे असून, त्यांनी ढमाले गॅंगच्या दिपक कदम याचा २९ मे २०२४ रोजी खून केल्याने उघड झाले आहे. याबाबत सांगवी आणि पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात हे आरोपी फरार झाले आहेत.
दोघे लातुरातील खुनाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर...
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारपैकी दोघे जण हे लातुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे उघड झाले आहे. ते सध्या जामिनावर बाहेर सुटले होते.