चार कोटींचे भाडे थकले; लातूर मनपाने १५ दुकानांना ठोकले सील
By हणमंत गायकवाड | Published: May 8, 2023 04:46 PM2023-05-08T16:46:21+5:302023-05-08T16:47:09+5:30
फ्रुट मार्केट येथील दुकानदारांकडून भाडे वसुली
लातूर : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरामध्ये महानगरपालिकेचे एकूण २०० दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांकडे चार कोटींचे भाडे थकले असून, वारंवार सूचना करूनही भाडे भरले जात नसल्याच्या करणामुळे मनपाच्या मालमत्ता विभागाच्या पथकाने सोमवारी १५ दुकानांना सील केले. उर्वरित दुकानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.
लातूर महानगरपालिकेच्या मालकीचे अण्णा भाऊ साठे चौक परिसरामध्ये २०० दुकाने भाड्याने दिले आहेत. फ्रुट मार्केट म्हणून या परिसराची ओळख झालेली आहे. प्रत्येक दुकानाला चार हजार रुपये मासिक भाडे आहे. त्यानुसार एका दुकानाकडे कमीत कमी दोन लाख रुपये भाडे थकलेले आहे. २०० दुकानदारांकडून चार कोटींचे येणे आहे. दुकानांना सील करण्याची कारवाई सुरू असताना काही दुकानदारांनी कारवाई थांबविण्याची मागणी केली. दोन दिवसांची मुदत द्या. आम्ही पूर्ण भाडे भरतो, असे कारवाई पथकाला सांगितल्याने दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. ज्यांनी काहीच भरणा केला नाही, अथवा म्हणणे मांडले नाही, अशा १५ दुकानांना सील केले असल्याचे मालमत्ता व्यवस्थापक रवी कांबळे यांनी सांगितले. सोमवारी कारवाई करण्यात आलेल्या पथकामध्ये मालमत्ता व्यवस्थापक रवी कांबळे यांच्यासह संभाजी देवकुळे, दीपक पवार, जगन्नाथ पवार, अभिषेक माळवे, अजय घोडके आदींचा समावेश होता.
भाडे थकल्याने कारवाई...
फ्रुट मार्केट येथील दुकानदारांकडे चार कोटींचे भाडे थकलेले आहे. त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. काही दुकानदारांना दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. मुदत संपल्यानंतर भाडे जमा न केल्यास दुकाने ताब्यात घेतली जातील. सद्य:स्थितीत दुकाने सील केली आहेत.
- रवी कांबळे, मालमत्ता व्यवस्थापक, लातूर मनपा