मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला

By आशपाक पठाण | Updated: December 10, 2024 15:22 IST2024-12-10T15:22:26+5:302024-12-10T15:22:52+5:30

कारेपूर गावावर शोककळा; वाघाळा पाटीवर कार-ट्रकच्या भीषण अपघातात कारेपूरच्या चार मित्रांचा मृत्यू; पोलिसांत निवड झालेल्या मित्रासह एकजण गंभीर जखमी

four friends death in Car-Truck accident near Waghala, Ambejogai; while returning home after friend's police selection celebration | मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला

मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला

रेणापूर (जि.लातूर) : दौंड येथे सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली. त्यामुळे त्याच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी जेवणाची पार्टी करून परत येत असताना कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना अंबाजोगाईनजीक वाघाळा येथे मंगळवारी पहाटे घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावात शोककळा पसरली आहे.

मित्राची पुणे येथे पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेही भोजनाचे आयोजन केले होते. रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावातील अजीम पाशामिया शेख या तरुणाची दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. याच निवडीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सहा तरुण सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान कार घेऊन बीडनजीक असलेल्या मांजरसुंबा येथे जेवणासाठी गेले होते. पार्टी करून कारेपूर गावाकडे येत असताना छत्रपती संभाजीनगर व लातूर या राष्ट्रीय महामार्गावर वाघाळा (ता.अंबाजोगाई) या गावाजवळ असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रानजीक ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. अपघातात बालाजी शंकर माने (वय २७), दीपक दिलीप सावरे (वय ३० ), फारुख बाबू मिया शेख ( वय ३० ) या तिघांचा जागीच तर ऋतिक हनुमंत गायकवाड (वय २४ ) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच पोलीस भरती झालेला अजीम पाशामीया शेख (३०) व मुबारक सत्तार शेख (२८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारेपूर गावावर शोककळा...
मित्राला नोकरी लागल्याने आनंद साजरा करण्यासाठी गेलेले सर्व तरूण रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे आहेत. सोमवारी रात्री मांजरसुंबा येथे जेवण करून मंगळवारी पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून बसले होते. पहाटे चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ मांजरसुंबा येथून निघून पुढे अंबाजोगाई कारखाना मार्गे कारेपूर गावाकडे जात असताना वाघाळापाटी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर कारची धडक झाली. यात चालक दिपक सावरेसह चौघांचा मृत्यू झाला तसेच कारचा चुराडा झाला आहे. दरम्यान, मयत चौघांवरही कारेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घटनेची माहिती गावात मिळताच गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: four friends death in Car-Truck accident near Waghala, Ambejogai; while returning home after friend's police selection celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.