विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह चौघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:58+5:302021-09-25T04:19:58+5:30
याबाबत सरकारी वकील ॲड. एस.आय. बिरादार यांनी दिलेली माहिती अशी की, येथील संत कबीर नगरात वर्षा हिचा विवाह बालाजी ...
याबाबत सरकारी वकील ॲड. एस.आय. बिरादार यांनी दिलेली माहिती अशी की, येथील संत कबीर नगरात वर्षा हिचा विवाह बालाजी कांबळे याच्यासोबत सन २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर जेमतेम दोन महिने वर्षा हिला सासरच्या मंडळींनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर माहेरहून घर बांधकामासाठी ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही दिवसांत मयत वर्षा ही गरोदर राहिली. त्यानंतर डोहाळे जेवणात पती बालाजी कांबळे यास सोन्याचे लॉकेट व अंगठी आण म्हणून पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. सततच्या त्रासाला कंटाळून वर्षा हिने ३१ डिसेंबर २०१६ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयत वर्षा यांचा चुलता विलास विठ्ठलराव शिंदे (रा. संत कबीर नगर) यांनी १ जानेवारी २०१७ रोजी सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांमध्ये एकूण नऊ आरोपी होते. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. नमूद ९ पैकी पती बालाजी दत्तात्रय कांबळे, सासरा दत्तात्रय कोंडिबा कांबळे, नणंद कमळाबाई दत्तात्रय कांबळे व रमाबाई सूर्यकांत कांबळे (सर्वजण रा. संत कबीर नगर) या चार आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. दोनचे न्या. वाय.पी. मणाठकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदरील खटल्यात साक्षीदारांनी योग्य साक्ष दिल्याची माहिती सरकारी वकील ॲड. शिवाजी बिरादार यांनी दिली.