माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरणारे चारजण जाळ्यात; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: January 28, 2023 07:34 PM2023-01-28T19:34:12+5:302023-01-28T19:37:04+5:30
विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांकडून मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चाेरीच्या घटना घडल्या.
लातूर : मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टाेळीतील चारजणांना पाेलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एका वाहनासह तब्बल ११ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कासार शिरसी पाेलिसांनी केली असून, बॅटरी चोरीच्या चार गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, रात्रीच्या वेळी कासार शिरशी परिसरात विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांकडून मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चाेरीच्या घटना घडल्या. याबाबत पोलिस ठाण्यात चाेरीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार कासार शिरशी पाेलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रेवन्नाथ डमाळे यांच्या पथकाकडून तपास केला जात हाेता. दरम्यान, पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे शैलेश श्रीमंत सूर्यवंशी (वय २३, रा. विद्यानगर निलंगा), सुदाम तानाजी हजारे (वय २३, रा. बिबराळ, ता. शिरूर अनंतपाळ), भीम नागनाथ जाधव (वय २६, रा. शिवाजीनगर, निलंगा) आणि ज्ञानेश्वर निवृत्ती शिंदे (वय ५०, रा. बोरसुरी ता. निलंगा) यांना ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी मोबाइल टॉवर कार्यालयामधून बॅटऱ्यांची चोरी केल्याचे कबूल केले. मोबाइल बॅटरी चोरीच्या चार गुन्ह्यांतील मोबाइल टॉवरच्या २८ बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने, दुचाकी असा एकूण ११ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, सहायक फौजदार मारुती महानवर, नामदेव चामे, बालाजी जाधव, राजू हिंगमिरे, गोरोबा घोरपडे, श्रीकांत वरवटे, महेश तोरंबे, शिवाजी लवटे, किशोर तपसे, वाजिद शेख, नवनाथ इंदापुरे, बाळू गायकवाड, बळी मस्के, अहमद मुल्ला, अंजना सुनापे यांच्या पथकाने केली.