लातुरात चार दुकाने जळाली, लाखोंचे नुकसान; गुरूवारी रात्रीची घटना
By आशपाक पठाण | Published: April 4, 2024 11:00 PM2024-04-04T23:00:15+5:302024-04-04T23:00:31+5:30
अग्निशामनकडून आग आटोक्यात
लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शी रोडवर असलेल्या पत्र्याच्या शेडमधील जवळपास ४ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरूवारी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी मनपाच्या अग्नीशामन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. रात्री १०.४५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पाचनंबरकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दुकानांच्या रांगेत पत्र्याच्या शेडमध्ये खाली ३ दुकाने व वरच्या मजल्यावर रक्ततपासणी लॅब आहे. खाली असलेल्या एका माेबाईल शॉपीच्या दुकानात पहिल्यांदा आग लागली. त्याच बाजूला असलेल्या हार्डवेअर दुकान तसेच चायनीजच्या हॉटेलचेही आगीत नुकसान झाले आहे. शिवाय, वरच्या बाजूला असलेल्या रक्त तपासणी लॅबही आगीत जळाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी शिवाजी नगर पोलिसांनीही भेट देऊन पाहणी केली.
आग विझविण्याचे काम सुरू...
महापालिकेच्या अग्नीशामन विभागाचे प्रमुख सुभाष कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शीरोडवरील तीन दुकानांना आग लागली आहे. अग्नीशामन दलाकडून सध्या आग विझविण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झालेले नाही.