विठूरायाच्या वारीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या
By Admin | Published: November 9, 2016 01:01 AM2016-11-09T01:01:22+5:302016-11-09T01:00:00+5:30
उदगीर कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूभक्तांच्या मांदियाळीसाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे़
चेतन धनुरे / श्रीपाद सिमंतकर उदगीर
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूभक्तांच्या मांदियाळीसाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे़ भाविकांची संख्या लक्षात घेऊन लातूर, नांदेड, बीदर येथून ४ विशेष रेल्वेंची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ परंतु, मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराने लातूरहून मंगळवारी सकाळी सुटलेल्या पहिल्या रेल्वेची माहितीच उशिरा देण्यात आली़ त्यामुळे या रेल्वेतून केवळ ८ प्रवाशांनी प्रवास केला.
कार्तिकी एकादशीला पंढरपुरी रंगणाऱ्या सोहळ्यासाठी हजारो भाविक जातात़ विशेषत: लातूर, नांदेड, बीदर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकांची संख्या मोठी असते़ ही बाब लक्षात घेऊन लातूरचे खासदार डॉ़सुनील गायकवाड, बीदरचे खासदार भगवंत खुब्बा, उदगीर व लातूर येथील रेल्वे संघर्ष समित्यांनी रेल्वे बोर्डाकडे विशेष गाड्यांसाठी मोठा पाठपुरावा केला़ त्याअनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेने या भागांसाठी चार विशेष रेल्वेची सोय करुन दिली़ त्यात नांदेड-पंढरपूर, अदिलाबाद पंढरपूर, लातूर-पंढरपूर व बीदर पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे़ यातील पहिली गाडी मंगळवारी सकाळी लातूरहून सकाळी ६.४५ वाजता पंढरपूरकडे रवाना झाली़ यानंतर नांदेड व अदिलाबाद येथून सुटणाऱ्या गाड्याही परळी, लातूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहेत़ बीदरहून सुटणारी विशेष रेल्वे १० नोव्हेंबरला रात्री ०९़०५ वाजता सुटेल़ ती भालकी, उदगीर, लातूररोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी व कुर्डूवाडी येथे थांबा घेऊन ११ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता पंढपुरात दाखल होईल़ परतीची रेल्वे ११ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता पंढरपूर स्थानकातून बीदरसाठी रवाना होईल़ ती याच मार्गे पहाटे ४ वाजता बीदरला पोहोचेल़ तसेच अदिलाबाद-पंढरपूर ही गाडी १० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता अदिलाबाद येथून निघून किनवट, हिमायतनगर, भोकर, मुखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, परळी, लातूरमार्गे ११ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता पंढरपूर पोहोचेल़ परतीची ही रेल्वे १६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता पंढपुरातून निघून त्याच मार्गे रात्री १२़३० वाजता अदिलाबादला पोहोचेल़ पंढरपूर-नांदेड रेल्वे ११ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता पंढरपुरातून निघून लातूरमार्गे ती रात्री ८़४५ वाजता नांदेडला पोहोचणार आहे़ तसेच १५ नोव्हेंबरला ही रेल्वे नांदेड येथून सायंकाळी ७़२५ वाजता नांदेड येथून निघून ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७़३० वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे़ ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत लातूरहून दररोज पंढरपूरसाठी रेल्वेसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ ही रेल्वे लातूरहून रोज सकाळी ७़४५ वाजता निघून पंढरपूरला दुपारी १२़४५ वाजता पोहोचेल़ परतीची रेल्वे त्याच दिवशी रोज दुपारी २ वाजता निघून लातूरला सायंकाळी ७ वाजता पोहोचेल़ या रेल्वेसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार सुनिल गायकवाड यांनी केले आहे.