देवणी येथील खुनाच्या तपासासाठी चार पथके; पाेलिस ठाण्यात व्यापारी, नागरिकांचा ठिय्या...
By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2023 09:12 PM2023-09-29T21:12:37+5:302023-09-29T21:13:30+5:30
देवणी येथील व्यापारी, राजकीय, सामाजिक संघटनांसह गणेश मंडळांच्या वतीने या खुनाचा तातडीने तपास करावा, मारेकऱ्यांना अटक करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देवणी (जि. लातूर) : येथील व्यावसायिक अशोक लुल्ले यांची त्यांच्या लाॅजमध्ये डोक्यात राॅड घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. घटनेच्या तपासासाठी चार पोलिस पथकांची नियुक्ती केली असून, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी देवणी येथील पाेलिस ठाण्यात व्यापारी, नागरिकांनी ठिय्या मांडला हाेता.
देवणी येथील व्यापारी, राजकीय, सामाजिक संघटनांसह गणेश मंडळांच्या वतीने या खुनाचा तातडीने तपास करावा, मारेकऱ्यांना अटक करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी निलंगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर हे देवणीत तळ ठाेकून आहेत.
तपासासाठी चार पोलिस पथकांची नियुक्ती केली आहे. या घटनेचा अतिशय बारकाईने तपास केला जात असून, लवकरच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे डाॅ. कटे यांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलिस उपनिरीक्षक डप्पडवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून केला जात आहे.