पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

By संदीप शिंदे | Published: May 24, 2024 04:44 PM2024-05-24T16:44:22+5:302024-05-24T16:46:16+5:30

पाण्याच्या मागणीसाठी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला.

four villagers attempted self-immolation in the hall of Chakur's block development officers for water | पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

चाकूर : तालुक्यातील हणमंत जवळगा येथे पाण्याची समस्या गंभीर बनली असून, पाण्याचे नियोजन करावे, हिंपळनेर येथील काही लोकांनी पाणी पुरवठा योजनेवरील पाईपलाईन, पॅनल बोर्डची तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून प्रशासनाकडे ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मात्र, दखल न घेतल्याने शुक्रवारी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी चौघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असून, पोलिसांनी त्यांना तातडीने रोखल्याने अनर्थ टळला.

हिंपळनेर येथील साठवण तलावातून हणमंत जवळगा गावाला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. हिंपळनेर गावातील काही नागरिकांनी या पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन, मोटार, पॅनल बोर्ड आदींचे नुकसान केले आहे. त्यामुळे हणमंत जवळगा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, गावातील लोकांना उन्हाच्या चटक्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. त्यावर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे धाव घेऊन निवेदनाद्वारे गाऱ्हाने मांडले. त्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची नासधूस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, हणमंत जवळगा गावचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरु करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही.

अखेर ग्रामस्थांनी ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी गावातील विठ्ठल उदगिरे, रामदास बालणे, तुकाराम केंद्रे, व्यंकट बेडदेसह पाचशेंहून अधिक पुरुष-महिला पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. त्यापैकी चौघांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या हातातील डिझेलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. त्यामुळे पुढील अनार्थ टळला आहे. याप्रसंगी तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरिक्षक कपिल पाटील यांनी आंदोलनकर्त्याना शांततेचे आवाहन केले.

पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार...
हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा योजनेची नासधूस केली असून, त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हणमंत जवळगा गावचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, पंचायत समितीच्या आवारात पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. यावेळी पोहेकॉ मारोती तुडमे, दत्तात्रय लांडगे, रितेश आंधूरकर, रविंद्र पेद्देवाड, पुनम शेटे, धोंडापूरे आदी उपस्थित होते.

Web Title: four villagers attempted self-immolation in the hall of Chakur's block development officers for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.