तक्रार देण्यास आलेल्या चौघांचा थेट पोलिस ठाण्यातच गोंधळ; आत्महत्येची दिली धमकी
By हरी मोकाशे | Published: March 8, 2023 02:55 PM2023-03-08T14:55:45+5:302023-03-08T14:56:56+5:30
याप्रकरणी एकजण फरार असून तिघांना न्यायालयीन कोठडी
किनगाव (जि. लातूर) : भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या चौघांनी किनगाव पोलिस ठाण्यात गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे अंमलदारास व मदतनीसास धक्काबुक्की करुन धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी किनगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील तिघांना अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी गणेश पोले, भाऊसाहेब पोले, मंगलबाई उर्फ शिवमंगल माने आणि तेजस पोले (सर्वजण रा. सुमठाणा, ता. अहमदपूर) हे त्यांच्यासोबत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी ४ मार्च रोजी येथील पोलिस ठाण्यात आले. तेव्हा ते जखमी असल्याने मेडिकलसाठी शासकीय दवाखान्यात पाठविले. मात्र, पुन्हा ठाण्यात येऊन आमचा गुन्हा दाखल करा म्हणून गोंधळ घालू लागले. तेव्हा ठाणे अंमलदारांनी आरोपींना समजावून सांगितले. परंतु, ते काहीही ऐकून घेतले नाही. उलट ठाणे अंमलदार व मदतनीस धक्काबुक्की करुन मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्यास सुुरुवात केली.
दरम्यान, आरोपी मंगलबाई माने यांनी ठाणे अंमलदाराच्या टेबलावर बांगड्या फोडून स्वत:च्या गळ्यास पदर लावून गळा आवळून धमकी दिली. दरम्यान, सपोनि. भाऊसाहेब खंदारे व पोउपनि. संदीप अन्येबोईनवाड यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकत नव्हते. याप्रकरणी पोलिस शिपाई सुजर कोतवाड यांच्या फिर्यादीवरुन वरील चारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील आराेपी भाऊसाहेब पाेले हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध किनगाव पोलिस घेत आहेत.