गुंतवणुकीचा कालावधी संपला, पैसेचे परत मिळेना; दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक
By हरी मोकाशे | Published: December 30, 2023 04:13 PM2023-12-30T16:13:29+5:302023-12-30T16:13:37+5:30
गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे
उदगीर : शहरातील बिदर रोडवरील तुळजाई ॲग्रोटेक कार्पोरेशन लि. नावाने व्यवसाय करणाऱ्या आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर व दामदुपटीचे प्रलोभन दाखवून सन २०१२ मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मागितले असता फिर्यादीस व गावातील इतर गुंतवणूक करणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बिदर रोडवरील तुळजाई ॲग्रोटेक कार्पोरेशन लि. नावाने स्थापना असलेल्या कंपनीत तुम्ही रोख रक्कम ठेवी म्हणून गुंतवा. त्यावर तुम्हाला आकर्षक व्याजदर व दामदुपटी एवढी रक्कम पुढील सहा वर्षांत परत येईल, असे प्रबोधन दाखवून फिर्यादीकडून रोख रकमा ठेव म्हणून स्वीकारले. आश्वासन दिल्याप्रमाणे २०१२ मध्ये फिर्यादी व गावातील काही जणांनी ठेवी ठेवल्या. त्याची मुदत २०१८ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर पैसे परत मागण्यासाठी गेले असता फिर्यादी व गावातील गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी अनिल शिवाजीराव खुदमपुरे (रा. मुदळ ता. कमलनगर, जि. बिदर) यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाजी बिराजदार (रा. उदगीर) व संजय उद्धवराव राठोड (रा. वडगीर, पोस्ट सवरमाळ) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.