बाधितांच्या नातेवाइकांसाठी मोफत अन्नसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:45+5:302021-05-19T04:19:45+5:30
अहमदपूर : शासनाच्या कडक निर्बंधांमुळे काेरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांचे जेवणासाठी होणारे हाल पाहून येथील पाच युवकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ...
अहमदपूर : शासनाच्या कडक निर्बंधांमुळे काेरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांचे जेवणासाठी होणारे हाल पाहून येथील पाच युवकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत भोजन डबे पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. युवकांनी सामाजिक बांधीलकी जपत विनामूल्य सेवा सुरू केल्याने गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. हॉटेल बंद असल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची मोठी अडचण होत आहे. अहमदपूर शहरात चार कोविड हॉस्पिटल आहेत. ग्रामीण रुग्णालयासह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांसह त्यांच्या नातेवाइकांना हॉटेल सेवा बंद असल्यामुळे भोजनाच्या डब्यांसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे.
शहरातील ही समस्या पाहून अहमदपुरात विलास शेटे, शंकर मुळे, नयुम शेख, गोपीनाथ जायभाये, माधव भदाडे या पाच युवकांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन मोफत भोजनाचे डबे पुरविण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. दररोज जवळपास १५० जेवणाचे डबे ते पुरवितात. दररोज दुपारी १२ आणि रात्री आठ वाजता शहरातील कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाइकांना तसेच रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण आणि गृह विलगीकरणातील व्यक्तींनाही जेवणाचे डबे ते घरपोच विनामूल्य पोहोच करतात.
ही सेवा २६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत जवळपास अडीच हजारांच्या जवळपास डब्यांचे वाटप केले आहे. तसेच सायंकाळी सहा ते ७ वाजेपर्यंत शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, नगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटपही केले जात आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले आहे.