लातूरच्या अपना ग्रुपकडून दररोज ३०० जणांना मोफत जेवण; पहाटे ३ पर्यंत घरपोच डबा
By आशपाक पठाण | Published: April 6, 2024 08:57 PM2024-04-06T20:57:14+5:302024-04-06T20:57:28+5:30
रमजान विशेष - आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो.
लातूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजाकडून अधिकचा सेवाभाव जोपासला जातो. यानिमित्त रोजा (उपवास) करणाऱ्यांना पहाटेच्या जेवणाची सोय नसलेल्या नागरिकांना घरपोच मोफत डबा पुरविण्याचे काम केले जात आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या रेणापूर नाका येथे अपना नाका ग्रुपच्या वतीने दररोज ३०० जणांना घरपाेच मोफत जेवण पुरविण्याचे काम केले जात आहे. त्यांचा हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू आहे.
शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये रमजान महिन्यात अनेक मुलांना पहाटेच्या सहेरची व्यवस्था होत नाही. ही बाब लक्षात आल्याने अपना ग्रुपच्या सदस्यांनी २०१२ मध्ये काही विद्यार्थ्यांना डबे पोहचविण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर दरवर्षी याला प्रतिसाद वाढत गेला. ग्रुपसोबत अनेक तरुणही जाेडले गेले. मागील तीन वर्षांत डब्याची मागणी वाढल्याने सर्वांना वेळेत डबा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. आलमपुरा चौकात दररोज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली जाते, पहाटे ३ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होतो. त्यानंतर १० मुले दररोज दुचाकीवर हॉस्पिटल, ट्युशन एरिया, तसेच अनेक गरजूंना घरपोच डबा देऊन येतात, असे ग्रुपचे असद मामू, सय्यद रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी सांगितले.
चौघांनी केली होती सुरुवात...
गरजूंना पहाटेच्या वेळी डबा देण्याची सुरुवात अपना नाका ग्रुपचे असद मामू, रियाज खतीब, मिनहाज खान, जाकेर शेख यांनी १० ते १२ वर्षांपूर्वी केली होती. कोराेनानंतर ग्रुपच्या वतीने रमजान महिन्यात यासंदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर मागणी वाढली. यावर्षी दररोज ३०० डबे घरपोच दिले जात असल्याचे सांगण्यात आले. केवळ ईश्वर सेवा म्हणून हा उपक्रम राबविला जात असून, रमजान महिन्यात कोणीही उपाशीपोटी सहेर (उपवास) करू नये, एवढीच यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
चपाती, भात, भाजीचा ताजा स्वयंपाक...
दररोज चपाती, एक सुकी भाजी, वरण, भात व अन्य भाजी डब्यात दिली जाते. जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य ताजे असते. जेवणावर विशेष लक्ष दिले जाते. जवळपास ५० स्वयंसेवक दररोज यासाठी राबतात. शहरात अनेक ठिकाणी फलक लावले आहेत, आमच्याकडे कोणी संपर्क केला की, त्यांना डबा घरपोच देण्यात येत असल्याचे रियाज खतीब यांनी सांगितले.