मध्यप्रदेशातील २० कामगारांसह सहा बालकांची मुक्तता

By आशपाक पठाण | Published: December 16, 2022 05:14 AM2022-12-16T05:14:29+5:302022-12-16T05:14:50+5:30

मजुरी न देता घेतले काम : भादा पोलिस ठाण्यात दोन जणांवर झाला गुन्हा दाखल

Freedom of 20 laborers along with six children from Madhya Pradesh | मध्यप्रदेशातील २० कामगारांसह सहा बालकांची मुक्तता

मध्यप्रदेशातील २० कामगारांसह सहा बालकांची मुक्तता

Next

औसा  (जि. लातूर ): मध्य प्रदेशातील २० वेठबिगार कामगार व ६ बालकांकडून लातूर जिल्ह्यात विविध भागात बळजबरीने ऊसतोडणीचे काम करून घेतले जात होते. मजुरीही दिली नाही, अशी तक्रार भादा पोलिस ठाण्यात देण्यात आल्याने दोन जणांवर बंदिस्त श्रमपद्धती अधिनियम १९७६ प्रमाणे गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित मजुरांना तहसील प्रशासनाने  शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मध्यप्रदेशकडे रवाना केले. 

मध्य प्रदेश राज्यातील पनिहार येथील ३० कामगारांना राकेश नामक व्यक्तीने पुणे येथे घेऊन आला. काही महिने काम करून घेत अशोक आडे (रा. कुरणवाडी तांडा ता. अंबाजोगाई) यांना कामगारांची टोळी दिली. त्याने संबंधित कामगारांकडून जवळपास दोन महिने औसा भागात काम करून घेतले. त्यांचे पैसेही दिले नाहीत. नाराज झालेले मजूर गावी निघाले असता त्यांना जाऊही दिले नाही. यातील एकाने पळून जाऊन मध्यप्रदेशात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दिल्ली नॅशनल कॅम्पेन कमिटी फॉर इरेडिकेशन ऑफ बाँडेड लेबर या सेवा संस्थेने पाठपुरावा करून जिल्हाधिकारी लातूर व औसा उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले. संस्थेचे ॲड. अमिन खान व तक्रारदार पप्पू भाटीगोपाळ हे लातूरला आले. तद्‌नंतर औसा प्रशासनाने कामगारांना तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्यांचे जबाब घेऊन म्हणणे जाणून घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले, दुकाने निरीक्षक एन. आर. खैरनार, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, पप्पू भाटीगोपाळ याच्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात राकेश बंजारा (मध्यप्रदेश), अशोक आडे (रा. कुरणवाडी, ता. अंबाजोगाई) यांच्यावर कलम ४२०, ३४२ कामगार ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. विलास नवले करीत आहेत.  मध्यरात्री मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी  व्यवस्था करण्यात आली होती. 

आम्ही कामगारांची मुक्तता केली...
मध्य प्रदेशातील मजूर होते. तिकडे तक्रार आल्याने चौकशी करण्यात आली. मजुरांना तहसील कार्यालयात आणून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २६ जणांना त्यांच्या गावी (मध्यप्रदेश) रवाना करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी सांगितले.

ही तर वेठबिगारीच...
 परराज्यातून प्रति १ हजार रुपये देऊन कामगारांना महाराष्ट्रात आणले गेले. त्यांना असह्य वेदना देत ऊसतोड व इतर कामे करून घेतली. त्यांची मजुरी देण्यात आली नाही. याबाबत मिळालेली माहिती व सदरची परिस्थिती पाहता हे वेठबिगारीच आहे, असे वेठबिगार(बंधुआ) मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर म्हणाले.

Web Title: Freedom of 20 laborers along with six children from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.