'माझी लेकर सरकारच्या स्वाधीन'; धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन
By संदीप शिंदे | Published: December 25, 2023 07:12 PM2023-12-25T19:12:43+5:302023-12-25T19:13:02+5:30
धनगर आरक्षणासाठी तरुणाचा टोकाचा निर्णय; रेल्वे खाली उडी घेऊन संपवले जीवन
चाकूर (जि.लातूर) : शासनाने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिले नसल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका ३६ वर्षीय व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना साेमवारी पहाटे तालुक्यातील आष्टानजिक उघडकीस आली. दरम्यान, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मयतावर अंत्यसंस्कार केले.
रमेश चंद्रकांत फुले (३६, रा. आष्टा ता. चाकूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही शासनाने आरक्षण दिले नसल्याने खचून गेलेल्या आष्टा येथील रमेश फुले यांनी रविवारी मध्यरात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर चाकूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, धनगर समाज विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकर यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. फुले यांच्या कुंटूंबियांना शासनाने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, कुंटूबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत एक महिन्याच्या आता सामावून घेण्याचे लेखी हमीपत्र द्यावे, त्यांच्या परिवाराला घरकूल तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तेव्हा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मयत रमेश फुले यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी आष्टा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत रमेश फुले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.
चिठ्ठीत होता असा मजकूर...
धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्न केले आहे. तरी सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे मी खचून गेलो, आत्महत्या करीत आहे. माझी लेकरे सरकारच्या स्वाधीन करत आहे, असा मजकूर मयत रमेश फुले यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.