लातुरात फर्निचरच्या दुकानाला आग; दारे-खिडक्यांसह १० लाखांचे नुकसान
By राजकुमार जोंधळे | Published: November 12, 2022 09:00 PM2022-11-12T21:00:24+5:302022-11-12T21:01:14+5:30
साराेळा राेडची घटना, आगीचे कारण अस्पष्ट
लातूर: शहरातील साराेळा राेड परिसरात असलेल्या (टिम्बर मार्केट) एका लाकडी अड्ड्याला शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये फर्निचरसह दारे-खिडक्या आणि ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दुकानदाराने तक्रार दिली आहे. आगीचे कारण मात्र समाेर आले नाही.
लातूर शहरातील विवेकानंद चाैक परिसरात असलेल्या सराेळा राेडवर माजिद बशीरसाब शेख यांचे दारे-खिडक्या तयार करण्याचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घराकडे गेले हाेते. दरम्यान, दुकानाशेजारी राहणारे पांढरे यांचा शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फाेन आला. तुमच्या दुकानाला आग लागली आहे, तातडीने दुकानाकडे या, असा त्यांनी निराेप दिला. फाेन ठेवताच मी दुकानाकडे धाव घेतली. याबाबत अग्निशमन दलाच्या केंद्राला फाेन करून माहिती दिली. शिवाय, विवेकानंद चाैक पाेलीस ठाणे गाठून पाेलिसांनाही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल हाेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत तयार करण्यात आलेले ७० दार, १५० च्यावर खिडक्या आणि त्यासाठी लागणारे इतर साहित्य असा जवळपास ९ ते १० लाखांचे नुकसान झाला आहे. आगीचे कारण अद्यापही समाेर आले नाही. घटनास्थळी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
नुकसान भरपाईची मागणी
दुकानदार माजिद शेख म्हणाले, गेल्या साराेळा राेडवर दारे-खिडक्या, फर्निचर आणि इतर साहित्य तयार करून विक्रीचे काम करताे. यासाठी दुकानात माेठ्या प्रमाणावर कच्चा माल आणून ठेवला हाेता. दरम्यान, मागणीनुसार दारे, खिडक्या तयार करून देताे. शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील १० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. याचा पंचानामा करून नुकसान भरपाई द्यावी. आगीला कारणीभूत असलेल्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.