शासकीय इमारतीत जुगार खेळला; दोघा पोलिसांसह १५ जणांना कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 06:23 PM2022-01-20T18:23:08+5:302022-01-20T18:24:09+5:30
चाकूर न्यायालयाने रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेऊन दिला निकाल
चाकूर (जि. लातूर) : पंचायत समिती परिसरातील सभापती निवासस्थानात तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १५ जणांना एक महिन्याची साधी कैद व प्रत्येकी दोनशे रुपयांच्या दंडाची शिक्षा चाकूर न्यायालयाने बुधवारी सुनावली आहे. रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेऊन न्यायालयाने जलदगतीने हा निकाल दिला आहे.
सभापतींच्या निवासस्थानात ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे, तसेच पोहेकॉ. शिवाजी मोहिते, संतोष साठे, साहेबराव हाके यांनी छापा मारून १५ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्याठिकाणी जुगार साहित्यासह १५ हजार २३० रुपये जप्त करण्यात आले. दरम्यान, तत्कालीन सभापती चंद्रकांत मारापल्ले हे जुगार खेळत नव्हते. मात्र, ते हजर होते. इंद्रजित मुंडे, चंद्रकांत चांदसुरे, विश्वास मिरकले मोहनाळ, माणिक मुंडे, भीमराव कुलकर्णी, रणजित मुंडे, विजय मारापल्ले, अंकुश येडले, रणजित मिरकले (सर्व रा. लातूररोड), गणपत कवठे (रा. भाटसांगवी), बालाजी गोलवार, बालाजी वंगाले (रा. चाकूर), मल्लिकार्जुन पलमटे (पोलीस कर्मचारी, रा. लातूर) या १४ जणांविरुद्ध चाकूर पोलिसांत मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल होऊन चाकूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
राजकीय वैमनस्यातून आरोपीविरुद्ध कट रचून पोलिसांनी ही कारवाई केली, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला; परंतु या आरोपाचा उलगडा झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना एक महिन्याची साधी कैद व प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ही शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास पाच दिवसांचा कारावास, असेही निकालात नमूद आहे. दरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने के.एस. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
पोलिसांचे राजकीय संबंध?
पोलिसांनी केलेली कारवाई राजकीय वैमनस्यातून असल्याचा बचाव आरोपींकडून करण्यात आला; परंतु कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत, हे त्यांना सिद्ध करता आले नाही.