दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना पाणी देऊन गांधीगिरी, औशात राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर संताप
By हरी मोकाशे | Published: December 24, 2022 05:43 PM2022-12-24T17:43:47+5:302022-12-24T17:44:07+5:30
Latur News: औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या.
- हरी मोकाशे
लातूर - औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या.
औसा नगरपालिकेत मनमानी कारभार सुरू असून लोकहिताच्या कामांकडे कानाडोळा केला जात आहे. प्रत्येक कामात नागरिक, व्यापाऱ्यांची अडवणूक केली जात आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. शहराची शोभा वाढविण्यासाठी मुख्य रस्त्यावरील हाश्मी चौक ते बसस्थानकापर्यंत दुभाजकात फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. परंतु, त्यास पाणी नसल्याने ती वाळत आहेत. लाखोची बिले देणाऱ्या पालिकेकडे झाडांना पाणी देण्यासाठी पैसे नाहीत का, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शहराची शोभा वाढविणाऱ्या झाडांचे संगोपन करेल, असे डॉ. अफसर शेख यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्या निलंबनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख, युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, जावेद शेख, गोविंद जाधव, दत्तात्रय कोळपे, मेहराज शेख, वलीखाँ पठाण, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, कीर्ती कांबळे, संगमेश्वर उटगे, ॲड. शिवाजी सावंत, सुनील बनसोडे, निशांत वाघमारे, ॲड. दत्ता घोगरे, बाळू जाधव, वसीम बोपले, अशोक गरड, शिवाजी शिंदे, उमर पंजेशा, युनूस चौधरी, बालाजी कांबळे, आनंद बनसोडे, रूपेश दुधनकर, विनायक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.