लातुरात मनसेची गांधीगिरी; काळ्या फिती बांधून मनपाचा निषेध करत राबवले स्वच्छता अभियान
By हणमंत गायकवाड | Published: October 4, 2023 12:19 PM2023-10-04T12:19:06+5:302023-10-04T12:19:13+5:30
शहर स्वच्छता न केल्यास मनपात कचरा टाकणार
लातूर : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘’एक तास स्वच्छतेसाठी खास’’ असा देशाला आणि प्रशासनाला संदेश दिला होताः त्याचे औचित्य साधून एक तारीख एक तास या उपक्रमात लातूर महापालिकेचे अधिकारी, पुढारी चमकोगिरी करीत असल्याचे दिसून आले. शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत. तिथे जाऊन जर एक तास स्वच्छता केली असती तर शहर स्वच्छ झाले असते, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवीत गांधीगिरी स्टाईलने मंगळवारी स्वच्छता अभियान राबविले. ज्या ठिकाणी कचरा नाही,अशा ठिकाणी झाडतानाचे फोटो काढल्याचा निषेध मनसेने केला.
शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसले नाहीत का?
लातूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. लातूर शहरातील कचऱ्याचे ढीग किमान गांधी जयंतीच्या दिवशी काढले असते तर लातूरकरांना समाधान वाटले असते. परंतु प्रशासनाने पंतप्रधानांनी आवाहन करूनही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली नाही. महापालिकेला व चमकोगिरी करून झाडलोटीचे फोटो काढणाऱ्या नेत्यांना स्वच्छता मोहीम कशी असते हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे शहराध्यक्ष मनोज अभंग यांच्या नेतृत्वाखाली दंडाला कळ्या किती बांधून प्रशासनाचा निषेध केला. खरी खरी स्वच्छता मोहीम कन्हेरी रोड,मोती नगर लातूर या ठिकाणी राबविण्यात आली.
शहर स्वच्छता न केल्यास मनपात कचरा टाकणार
यावेळी संतोष नागरगोजे यांनी शहर महापालिकेने दोन दिवसात स्वच्छता मोहीम राबवून जर कचऱ्याचे ढीग नाही उचलले तर मनसे स्वच्छता मोहीम राबवून कचरा महापालिकेत आणून टाकेल, असा इशारा दिला आहे. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राठोड, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, रणवीर उमाटे, अंकुश शिंदे, अजय कलशेट्टी, जहांगीर शेख, अनिल जाधव,धनंजय मुंडे, गणेश पवार, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.