Ganesh Mahotsav: लातुरात गणेश मंडळांना दिलासा; सवलतीच्या दरात मिळणार वीज जोडणी
By हणमंत गायकवाड | Published: August 29, 2022 05:14 PM2022-08-29T17:14:57+5:302022-08-29T17:16:26+5:30
Ganesh Mahotsav सुरक्षित वीज वापरासाठी गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडण्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
लातूर : सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी दिली जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत हा उत्सव असून, पहिल्या शंभर युनिटसाठी ४ रुपये ७१ पैसे, १०१ ते १०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे आणि ३०० ते ५०० युनिटसाठी प्रति युनिट ११ रुपये ७२ पैसे तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरासाठी १३ रुपये २१ पैसे युनिट आकारले जाणार आहे. सवलतीच्या वीज जोडणीचा मंडळांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सुरक्षित वीज वापरासाठी गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडण्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. अनधिकृत मार्गाने वीज घेतल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी महावितरणने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.
गणेशोत्सवात पावसाची शक्यता; वीज वापर हवा सुरक्षित
गणेशोत्सव काळामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीज वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मंडप व रोषणाईसाठी व्यवस्था, संचमांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडूनच करून घेणे आवश्यक आहे. वीज यंत्रणेचे अर्थिंग सुव्यवस्थित असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास मंडपाच्या लोखंडी पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते. त्यासाठी खबरदारी हवी.
धोके टाळण्यासाठी हेल्पलाईन
गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकाशिवाय कंट्रोल रुम लातूर ७८७५७६२०२१ या भ्रमणध्वनीशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.