राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: August 18, 2022 07:10 PM2022-08-18T19:10:53+5:302022-08-18T19:13:00+5:30
अटकेतील एका एका सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात २४ ते ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
लातूर : औरंगाबाद, बीड, नांदेड, यवतमाळसह लातूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत घर, दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीतील चार जणांच्या मुसक्या लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुरुवारी आवळल्या आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील कार आणि ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातुरातील श्रीनिकेतन सोसायटीतील आदित्य शिरीष बांडेवार (३१) यांचे रो-हाऊस १० जुलै रोजी रात्री ८ वाजता फोडले. रोख ५ लाख, चांदीचे भांडे, सोन्याचे दागिने असा एकूण २३ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्याने पळविला. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घरगोडीच्या तपासासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली होती. शिवाय, स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरु केला होता. स्थागुशाच्या पथकाने लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड (२९), किशोर उर्फ पपू काशिनाथ जोगदंड (३९) आणि प्रवीण उर्फ डॉन्या चंद्रकांत माने (३१) यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची आणि साथीदारांची माहिती दिली. या तीन आरोपीकडूनगुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम असा १४ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड-यवतमाळ सीमेवर सापळा...
गुन्ह्यातील अट्टल आरोपी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, पोफळी हद्दीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. या भागात सापळा लावत सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे ( ३४), अविनाश शंकर देवकर (२९), सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (३८) आणि सूदर्शन उर्फ सोन्या विठ्ठलराव माने (२३) यांच्या सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या. असे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले.
१३ गुन्ह्याचा झाला उलगडा...
लातुरातील विवेकानंद चौक ८, एमआयडीसी २, शिवाजी नगर १, नांदेड जिल्ह्यातील भोकर १, अंबाजोगाई १अशा १३ गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई...
अटकेतील एका एका सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात २४ ते ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सुरेश मुळे याच्याविरोधात औरंगाबाद, बीड जिल्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई झाली असून, त्याच्यावर २४ गुन्हे दाखल आहेत. तर सूर्यकांत गंगणे याच्याविरुद्ध बीड जिल्ह्यात मोक्का कारवाई केली असून, ५गुन्हे दाखल आहेत. अविनाश देवकर याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यात १८ गुन्हे, लखन जोगदंड याच्यावर ३० गुन्हे आणि प्रवीण उर्फ डॉन्या याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत.