‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच !

By राजकुमार जोंधळे | Published: July 8, 2024 10:41 AM2024-07-08T10:41:51+5:302024-07-08T10:42:41+5:30

नाव बदलून एजंटांची दिशाभूल; विविध गुन्ह्यांत घेणार सीबीआय ताब्यात

Gangadhar is the leader of the cheating racket in NEET | ‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच !

‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच !

लातूर : नीटमध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधारच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दिल्ली, महाराष्ट्र अन् दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात त्याचे नेटवर्क असल्याची माहिती समाेर आली आहे. नावात काही प्रमाणात बदल करून ताे या गाेरखधंद्यात वावरत असल्याचे सीबीआयने सांगितले. आपली ओळख लपवून त्याने विविध राज्यांतील एजंटांचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

लातुरात दाखल गुन्ह्यातील चाैघांपैकी दाेघांना यापूर्वीच अटक झाली असून, दिल्लीतील म्हाेरक्या गंगाधारच्या मुसक्या सीबीआयने आंध प्रदेशातून आवळल्या आहेत. सध्या ताे बंगळुरूत सीबीआयच्या काेठडीत आहे, तर लातुरात संजय जाधव याच्या जप्त माेबाइलमध्ये एन. गंगाधार अप्पा या नावाने त्याचा माेबाइल क्रमांक सेव्ह आहे. यावरून त्याने विविध राज्यांतील एजंटांपासून आपली ओळख लपविण्यासाठी नावात बदल केल्याचे उघड झाले आहे.

उत्तरेत गंगाधार, तर दक्षिणेत एन. गंगाधर अप्पा...

संजय जाधव ज्या माेबाइल क्रमांकावरून गंगाधारशी संपर्कात हाेता. त्याच्या माेबाइलमध्ये हा क्रमांक ‘एन. गंगाधर अप्पा...’ या नावाने सेव्ह असल्याचे सीबीआयने सांगितले. उत्तरेत ताे गंगाधर... तर दक्षिणेत एन. गंगाधर अप्पा... झाल्याचे समाेर आले आहे. एजंटांनाही आपला सुगावा लागणार नाही, याची खबरदारी त्याने घेतली आहे.

एफआयआरला गंगाधारच...

गुणवाढीच्या संशयावरून एकाच दिवशी संजय जाधव, जलीलखाॅ पठाण आणि इरण्णा काेनगलवारच्या घरावर नांदेड एटीएसने छापा मारला. माेबाइलही जप्त केले हाेते. दरम्यान, दिवसभराच्या चाैकशीतून त्यांना साेडून देण्यात आले हाेते. मात्र, जप्त माेबाइलमधून अनेक धक्कादायक संदर्भ समाेर आले. त्यानंतर लातुरातील शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या एटीएसच्या तक्रारीत गंगाधार (रा. दिल्ली) असा स्पष्ट उल्लेख आला आहे.

किती राज्यांत पसारा?

दिल्लीतील सूत्रधार गंगाधरचा किती राज्यांत पसारा आहे, याचा शाेध आता सीबीआयकडून घेतला जात आहे. प्राथमिक चाैकशीत दिल्लीबाहेर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात त्याच्याशी संपर्कात असलेल्या एजंटांचा संदर्भ हाती आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती माेठी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्याला आंध्रातून अटक केली असून, ताे बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत आहे.

गंगाधरला लातुरात आणले जाणार?

गंगाधारला लातुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत चाैकशीसाठी आणले जाणार असल्याची शक्यता आहे. न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार सीबीआयला संजय जाधव अन् गंगाधारची समाेरासमाेर चाैकशी करायची आहे. साेमवारी गंगाधारलाही लातूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
 

Web Title: Gangadhar is the leader of the cheating racket in NEET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.