गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:40+5:302021-07-23T04:13:40+5:30
अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे ...
अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे लागत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात २५ रुपये ५० पैसे तर व्यावसायिक गॅस ८२ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तेल, डाळींपासून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा तडका बसल्याने नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी बसावे लागले. अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागले. नंतरच्या चार-पाच महिन्यांत पुन्हा गाडी रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच दुसरी लाट सुरू झाली. या परिस्थितीमुळे सगळ्याच घटकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. असे असतानाच महागाई कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे तेल, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी अगोदरच त्रस्त असताना आता गॅसची दरवाढ करून जनतेला झटका बसला आहे. घरगुती गॅस २५ रुपये ५० पैशांनी तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. गॅसचे दर गगनाला भिडले असताना सबसिडीही अवघ्या ८ रुपयांची मिळत आहे. सद्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवरून ८५९ रुपये ५० पैसे झाला आहे. जून महिन्यात व्यावसासिक सिलिंडरची किंमत १ हजार ५३६ रुपये इतकी होती. परंतु जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ८२ रुपयांची वाढ होऊन त्याची
किंमत १ हजार ६१९ रुपये झाल्याने व्यावसायिकांचेही दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे.
दरवाढ तत्काळ मागे घ्यावी...
घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी तर व्यवसायिक गॅसच्या किमती ८२ रुपयांनी वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने गॅसची दरवाढ तत्काळ कमी करावे.
शासनाने पूर्वीप्रमाणे सबसिडी द्यावी तरच सर्वसामान्यांना गॅस वापरणे फायद्याचे राहील. वाढत्या दरामुळे ग्रामीण भागात अनेकांनी चुलीचा वापर सुरू केला आहे.- रामानंद मुंडे
खर्च कसा भागवणार तरी कसा...?
गेल्या वर्षीपासून गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गॅस सिलिंडर, तेलापासून डाळी, कडधान्ये, भाजीपाल्यापर्यंत सगळ्यांचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यावर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. पैसे नसल्याने आर्थिक चणचण असते. असेच होत राहिले तर घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - चंद्रकला आनंतवाळ