गायरान जमीनीवर अतिक्रमण करून घर बांधले, मावलगावचे सरपंच झाले अपात्र
By आशपाक पठाण | Published: June 20, 2024 07:59 PM2024-06-20T19:59:16+5:302024-06-20T19:59:42+5:30
गायरान जागेत घराचे बांधकाम केल्याचे निष्पन्न
लातूर : गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करीत घरबांधकाम केल्याचा ठपका ठेवत अहमदपूर तालुक्यातील मावलगावचे सरपंच शिवाजी नरबाजी संपते यांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अपात्र ठरविले आहे. शिवाय, मावलगावचे सरपंचपद हे रिक्त झाल्याचे घोषित केले आहे.
मावलगाव येथील जमीन गट नंबर २८८ मधील ३.२० हे.आर. सरकारी गायरान जमीन ही शासनाच्या मालकी व कब्जेची आहे. याठिकाणी सरपंच शिवाजी संपते यांनी २ हजार चौरस फुट क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ग्रामसेवकाशी संगमणत करून ग्रामपंचायत दप्तरी नोंद लावून घेतली. अतिक्रमित क्षेत्राचा मालमत्ता क्रमांक टाकून ८ अ उतारा केलेला आहे. याठिकाणी सक्षम प्राधिकरणाकडून बांधकाम परवाना न घेता पक्के आरसीसीचे घर बांधकाम करून ग्रामपंचायत दप्तरी तशी नोंदही केली. यासंदर्भात मावलगाव येथील गणपत भानुदास संपते व रंगनाथ किशनराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सर्व साक्षी पुरावे तपासणी झाल्यावर गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याने सरपंच शिवाजी संपते यांना अपात्र घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे सरपंचपद हे रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. अर्जदाराकडून ॲड.जीवन करडे यांनी बाजू मांडली.
सरपंचपद रिक्त झाल्याची घोषणा...
अर्जदार गणपत भानुदास संपते, रंगनाथ किशनराव पाटील (रा. मावलगाव) यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (जे-३), १६ व ५३ अंतर्गत यांनी दाखल केलेला अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला. गैरअर्जदार शिवाजी संपते यांना ग्रामपंचायत मावलगाव येथील सरपंच पदावरून तत्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्यात येते. थेट सरपंचद पद हे रिक्त झाल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घोषित केले.