धक्कादायक! लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:30 PM2018-10-16T19:30:12+5:302018-10-16T20:57:01+5:30
विशाल नगरात राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना घडली.
लातूर : शहरातील विशाल नगरात राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून खून करण्यात आल्याची घटना घडली. तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून, यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपूर्वा अनंतराव यादव (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अपूर्वा ही घरात एकटीच होती. तिची आई देवदर्शनासाठी घराबाहेर गेली होती. तर वडील हे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, हल्लेखोराने ती घरात एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. देवदर्शनावरून घरी परतलेल्या आईला अपूर्वा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
शेजारी राहणा-या काही लोकांनी तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, तोपार्यंत अपूर्वाचा मृत्यू झाला होता. शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी अपूर्वाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी भेट देऊन पंचनामा केला.
जमखंडी येथे वैद्यकीय शिक्षण...
लातुरात आपल्या आई-वडिलांसह राहणा-या अपूर्वा यादव ही तरुणी कर्नाटक राज्यातील जमखंडी-बागलकोट येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. बीएचएमएसमध्ये प्रथम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ती लातुरात आपल्या घरी आली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास ती घरात एकटी होती. यावेळी हल्लेखोर घरात घुसून तिचा खून केला. हल्ल्यानंतर मारेकरी घराला बाहेरून कडी लावून पसार झाले. आई घरी आल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांना सांडलेला चहा आणि कप आढळून आला.
खुनाचे कारण अस्पष्ट...
अपूर्वा यादव या तरुणीचा खून कशासाठी झाला, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या कारणांचा लातूरचे पोलीस शोध घेत आहेत. अपूर्वा ही एकुलती एक मुलगी होती. तिचा असा निर्घृण खून करण्यात आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत, या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी दिली.
अपूर्वावर ढोकीत गुन्हा दाखल...
अपूर्वा यादव आणि एका युवकावर ढोकी (जि. उस्मानाबाद) येथील पोलीस ठाण्यात जुलै महिन्यामध्ये कलम ३०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात युवकाला अटकपूर्व जामीन मिळला. तर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या अनुषंगानेही लातूरचे पोलीस तपास करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे म्हणाले.