मुलींच्या वसतिगृह इमारतीस उद्घाटनाचा मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:01+5:302021-01-23T04:20:01+5:30
जळकोट : दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या मागासवर्गीय १०० मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत निर्माण झाली आहे. त्यासाठी १० कोटींचा खर्च ...
जळकोट : दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या मागासवर्गीय १०० मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत निर्माण झाली आहे. त्यासाठी १० कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, अद्यापही उद्घाटन झाले नसल्याने या इमारतीस उद्घाटनाची प्रतीक्षा लागून असल्याचे दिसून येत आहे.
मागासवर्गीय मुलींचे शिक्षण आणि निवासाची सोय व्हावी म्हणून तत्कालीन समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, समाजकल्याण सहायक आयुक्त अरावत, समाजकल्याण अधिकारी गायकवाड व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जळकोटात शासकीय वसतिगृह उभारले. त्यासाठी १० कोटींचा खर्च करण्यात आला. दरम्यान, या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच रंगरंगोटीही झाली आहे. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाकडे जाणारा रस्ताही काहीअंशी डांबरीकरण करण्यात आला आहे.
सध्या शिक्षणासाठी आलेल्या मुलींना शहरात राहण्यासाठी खोली मिळत नाही. कोरोनाचे कारण पुढे करीत कुणीही घर भाड्याने देण्यास धजावत नाही. त्यामुळे या वसतिगृहाचे उद्घाटन होणे गरजेचे ठरत आहे. मात्र, अद्यापही प्रशासनास उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. या इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करावे आणि मुलींना शिक्षण व निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी खादरभाई लाटवाले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, संग्राम नामवाड, दिलीप कांबळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, ॲड. तात्या पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, भाऊराव कांबळे, संग्राम कांबळे, संग्राम नामवाड, आदींनी केली आहे.
सर्व कामे पूर्ण करून उद्घाटन...
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, संबंधित विभागाकडून शासकीय वसतिगृहाची माहिती घेऊन सर्व कामे पूर्ण करून घेण्यात येतील. ती पूर्ण झाली असल्यास तत्काळ त्याचे लोकार्पण करण्यात येईल. त्यामुळे मुलींची अडचण दूर होईल.