शाळांनी केलेल्या मूल्यमापनातही ०.३ टक्क्यांनी मुलींची सरशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:31+5:302021-07-17T04:16:31+5:30
लातूर : दहावीचा असो की बारावीचा. दरवर्षी निकालात मुलींची सरशी ठरलेली. यंदाही शाळांनी केलेल्या दहावीच्या मूल्यांकनामध्ये लातूर जिल्ह्यात ०.३ ...
लातूर : दहावीचा असो की बारावीचा. दरवर्षी निकालात मुलींची सरशी ठरलेली. यंदाही शाळांनी केलेल्या दहावीच्या मूल्यांकनामध्ये लातूर जिल्ह्यात ०.३ टक्क्यांनी मुलींचीच सरशी झाली आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६० टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६३ टक्के आहे. मुलांपेक्षा ०.३ टक्क्यांनी मुलींनी बाजी मारली आहे. मूल्यांकनासाठी लातूर जिल्ह्यातून २२ हजार ८१९ मुले आणि १७ हजार ४६२ मुलींची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ८१७ मुलांची आणि १७ हजार ४६० मुलींचे शाळेतील वर्गशिक्षक व विषय शिक्षकांकडून मूल्यांकन झाले. त्यात २२ हजार ७०७ मुले आणि १७ हजार ३९६ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण ४० हजार १२२ मुले-मुली या मूल्यांकनात उत्तीर्ण झाले. या मूल्यांकनातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६० टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६३ टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उत्तीर्णतेत मुलींचाच टक्का अधिक आहे.
तालुकानिहाय मुला-मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण...
तालुका मुले मुली
लातूर ९९.६५ ९९.५५
अहमदपूर ९९.३८ ९९.५६
औसा ९९.३६ ९९.५९
चाकूर ९९.४२ ९९.८२
देवणी ९९.७४ ९९.५५
जळकोट ९९.७३ ९९.४०
निलंगा ९९.६८ ९९.७५
रेणापूर ९९.६३ ९९.७८
शि. अनंतपाळ ९९.६३ ९९.७८
उदगीर ९९.८० ९९.६७
असे झाले दहावीचे मूल्यांकन...
कोविड-१९च्या वाढत्या पार्श्वभूमीवर शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची विषयनिहाय संपादणूक शाळांमार्फत निश्चित करण्यात आली. मूल्यमापन वस्तूनिष्ठ होण्यासाठी शाळास्तरावर निकाल समितीचे गठन करण्यात आले. या समितीत विषय शिक्षक व वर्गशिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या समितीने अंतिम केलेले गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीत नाेंदविण्यात आले. या गुणदानाचे स्वाक्षरीत परिशिष्टे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यात आली. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, त्यात मुलींची सरशी झाली आहे.
लातूर मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल...
गुणांच्या आधारे रॅन्डम पद्धतीने संगणकीय प्रणालीत भरलेल्या गुणांची पडताळणी करण्यात आली असून, निकालाच्या या कामात शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील घटकांचे योगदान असून, लातूर मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल लागला आहे.