'हायवेवरून गावात जाण्यासाठी जागा द्या'; सांगवीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन
By संदीप शिंदे | Published: July 14, 2023 03:45 PM2023-07-14T15:45:48+5:302023-07-14T15:46:29+5:30
भरधाव वाहनांमुळे अक्षरशः जीव मुठीत घेवून नागरीकांना वावरावे लागत आहे.
अहमदपूर : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ सांगवी सुनेगाव या चौरस्त्यावर रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सांगवी सुनेगाव हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आहे. तसेच येथूनच परभणीकडे जाणारा रस्ता असून, या ठिकाणी वाहतूकीचे मोठे जंक्शन निर्माण झाले आहे. गावात अंगणवाडी, शाळा, विद्यालय, मंदीर असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी लहान मुलांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच शेतीसाठी बैलबारदाना रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने शेतकरी बांधवसूध्दा मोठ्या अडचणीत सापडला आहे. भरधाव वाहनांमुळे अक्षरशः जीव मुठीत घेवून नागरीकांना वावरावे लागत आहे. तसेच दररोज छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या सोयी करता पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच सुनेगांव येथे सर्व्हिस रोड मंजूर करावा, बसथांबा तयार करावा आदी मागणीसाठी गावातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस रेखा तरडे हाके-पाटील, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, सरपंच राजेश कांबळे, सदस्य आकाश सांगवीकर, नरसिंग कोंडेवाड आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनास शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी भेट दिली. यावेळी गजेंद्र कांबळे, शरद कांबळे, पापा देवकत्ते, निसार शेख, संदीप कांबळे, राजू सूरनर, अप्पाराव सूरनर, सूनिल कांबळे, रमाकांत कांबळे, नामदेव सूरनर, असद शेख, लक्ष्मणराव वाघमारे, संतोष राठोड, संतोष चव्हाण, मूस्तफा सय्यद, फेरोज शेख, बाबुलाल शेख, नंदू वाडकर, भगवान दुर्गे, उत्तम सांगवीकर आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.