गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!
By हरी मोकाशे | Updated: January 20, 2025 12:40 IST2025-01-20T12:36:21+5:302025-01-20T12:40:42+5:30
स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन!

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!
लातूर : भारत स्काऊट- गाईडमध्ये मूकबधीर मुलांना विशेष घटकातून संधी मिळणे अपेक्षित असले तरी आजपर्यंत ती मिळत नव्हती. प्रथमच लातूरने जिल्ह्यातील २५० मुला- मुलींना सहभागी करुन घेतले आहे. विशेषत: येत्या प्रजासत्ताकदिनी ६४ मुला-मुलींची तुकडी स्काऊट- गाईडच्या गणवेशात जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणात मानवंदना देणार आहे. हा उपक्रम राज्यासाठी पथदर्शी आहे.
चारित्र्य संपन्न नागरिक घडविण्यासाठी जागतिक पातळीवर स्काऊट-गाईड चळवळ आहे. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा वाढावा, सांस्कृतिक आदान- प्रदान होऊन मुलांचे सर्वांगिण व्यक्तीमत्त्व विकास करण्याचे कार्य चळवळीतून होते. शिवाय, मुलांमधील उपजत कौशल्य गुणांची जोपासना करण्याबरोबर चारित्रार्थासाठी मदतही होते. या चळवळीत आजपर्यंत शाळांतील सर्वसाधारण मुले सहभागी होत होती. आता दिव्यांगांनाही संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सांकेतिक भाषेतून आदेशाचे पालन...
दिव्यांग प्रवर्गातील मूकबधीर मुलांना बोलताही अन् ऐकताही येत नाही. त्यामुळे ही मुले संचलनावेळी ऑर्डर कशी फॉलो करणार, असा प्रश्न सर्वांनाच असणार आहे. मात्र, मूकबधीर शाळेचे विशेष शिक्षक व पथक प्रमुख सांकेतिक भाषेतून सूचना करणार आहेत. त्यामुळे हे क्षण पाहण्यास औत्सुक्याचे ठरणार आहे.
२५० मुले- मुली...
स्काऊट- गाईडमध्ये जिल्ह्यातील ११ मूकबधीर शाळा सहभागी असून २५० पेक्षा अधिक मुला- मुलींनी नोंदणी केली आहे. या मुलांना संस्थेच्या वतीने गणवेश, टोपी, स्कार्प, सॉक्स, शूज, बेल्ट हे साहित्य देण्यात येत आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे हे सहकार्य करीत आहेत.
दिव्यांगांना पुढे आणण्याचा प्रयत्न...
दिव्यांग मुले समाजात हिरीरिने सहभागी व्हावे. त्यांच्या हातूनही समाजसेवा घडावी आणि हे विद्यार्थी लोकाभिमुख व्हावे म्हणून हा प्रयत्न आहे. उपक्रमास लातूर विभागातून सुरुवात होत आहे. त्यातही नांदेड, धाराशिव, हिंगोलीपैकी लातुरातून श्रीगणेशा होत असल्याने त्याचा मनस्वी आनंद आहे.
- अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, लातूर.
हम भी कम नही...
दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात फारशी येत नाहीत. या उपक्रमामुळे कला- गुणांना वाव मिळणार आहे. त्यामुळे मुलांत हमी भी कम नही, ही भावना वाढीस लागणार आहे.
- डॉ. शंकर चामे, जिल्हा संघटक, भारत स्काऊट- गाईड.