मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

By हरी मोकाशे | Published: October 29, 2023 06:20 PM2023-10-29T18:20:36+5:302023-10-29T18:20:54+5:30

गोंद्री येथील शरद वसंत भोसले हा सर्वसाधारण कुटुंबातील सुशिक्षित तरुण होता.

Gondrit youth commits suicide for Maratha reservation, third incident in Latur district | मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

लातूर : मराठा समाज आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी औसा तालुक्यातील गोंद्री येथील शरद वसंत भोसले (वय ३२) या तरुणाने रविवारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जिल्ह्यातील ही तिसरी आत्महत्या आहे.

गोंद्री येथील शरद वसंत भोसले हा सर्वसाधारण कुटुंबातील सुशिक्षित तरुण होता. आई- वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुलींसह शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. मराठा समाजास आरक्षण नसल्याने होणारी ससेहोलपट आणि सरकारचा वेळ काढूपणा पाहून नैराश्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

दरम्यान, शरद भोसले यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरु ठेऊ असा निर्धार समाज बांधवांनी केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोनि. सुनील रेजितवाड, सपोनि. प्रशांत लोंढे हे दाखल झाले.

चिठ्ठीत मराठा आरक्षण व नापिकीचा उल्लेख...
मला माफ करा... मी चुकीचे करीत आहे, पण हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार उठत नाही. निसर्ग साथ देत नाही आणि मराठ्यांना आरक्षण भेटत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. हे सरकार अजून किती बळी घेणार, आई- बाबा मला माफ करा, बाळा मी तुमच्यासाठी काही करु शकलो नाही. एक मराठा- लाख मराठा, असा मजकूर चिठ्ठीत शरद भोसले यांनी लिहिला आहे.

लातूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन...
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा येथील माजी सरपंच व्यंकटराव ढोपरे यांनी मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांचा मृतदेह आणलेली शववाहिका रविवारी सकाळी थेट शिरुर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमाेर आणण्यात आली. आरक्षण मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पावित्रा घेण्यात आला. दरम्यान, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सरकारी माहितीच्या फलकावरील मंत्र्यांच्या फोटोला तरुणांनी काळे फासले. तसेच शहरातील गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून महिलांनी शोले स्टाइल आंदोलन केले.
 

Web Title: Gondrit youth commits suicide for Maratha reservation, third incident in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.