बंगळुरुमध्ये शहाजी राजेंचे स्मारक शासनाने उभारावे- एम.जी. मुळे
By हरी मोकाशे | Published: January 12, 2024 07:15 PM2024-01-12T19:15:50+5:302024-01-12T19:16:50+5:30
या मागणीसाठी छत्रपतींच्या वंशजांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची संकल्पना ही त्यांचे पिता शहाजी राजे यांची होती. शहाजी राजे यांची कर्नाटकातील बंगळुरुमध्ये समाधी आहे. तिथे शासनाने स्मारक उभारुन संग्रहालय निर्माण करावे, अशा मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला देणार असल्याची माहिती कर्नाटकातील माजी आ. एम.जी. मुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी विश्वगौरव शिवछत्रपती स्वराज्य रथ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराणा सुयश सिंह, बिहारचे माजी आ. प्रेमरंजन पटेल, जनार्दन पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, ॲड. सुभाष पाटील, प्रा. सूर्यकांत जाधव, रामदास पवार, ॲड. उदय गवारे आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी आ. मुळे म्हणाले, शहाजी राजे यांनी लोककल्याणकारी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती करावी, ही संकल्पना शहाजी राजे यांची होती. मात्र, दुर्देवाने इतिहास अभ्यासक, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहाजी राजे यांची समाधी कर्नाटकात असून तिथे २० गुंठे जमीन आहे. या परिसराचा विकास व्हावा आणि तिथे स्मारक उभारावे तसेच संग्रहालय, अत्याधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला देणार आहे. तसेच या मागणीसाठी छत्रपतींच्या वंशजांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षातून एकदा तरी समाधीचे दर्शन घ्यावे...
शहाजी राजेंच्या समाधीच्या दर्शनासाठी वर्षातून किमान एकदा तरी शिवप्रेमींनी यावे. महाराष्ट्रातील शिवप्रेमींची गर्दी पाहून कर्नाटक सरकारलाही जाग येईल आणि समाधी स्थळाचा आधुनिक पध्दतीने विकास होण्यास मदत होईल, असेही माजी आ. एम.जी. मुळे म्हणाले.