लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!
By हरी मोकाशे | Published: August 23, 2023 05:48 PM2023-08-23T17:48:19+5:302023-08-23T17:48:42+5:30
नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव
लातूर : प्रत्येक गावचा आत्मा ही ग्रामपंचायत असते. त्यामुळे विविध कामानिमित्ताने गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, जिल्ह्यातील १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण होऊन त्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी, गाव कारभाऱ्यांना खिळखिळ्या इमारतींच्या भिंती अन् छताकडे पाहत गावचा कारभार हाकावा लागत आहे.
गावासह वाडी- वस्ती, तांड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय- धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतींद्वारे होते. प्रत्येक ग्रामपंचायत ही अधिक सक्षम व्हावी म्हणून शासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गावांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधीचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, जिल्ह्यातील ४४ गावांत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीस इमारत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे तिथे बसण्यास गाव कारभाऱ्यांचा जीव धजावत नाही.
४४ गावांमध्ये ग्रामपंचायतीसाठी इमारत नाही...
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच ४४ ग्रामपंचायतींसाठी इमारत नाही. त्यात लातूर- ५, औसा- १०, निलंगा- ९, देवणी- ४, उदगीर- १०, अहमदपूर- ३, चाकूर - २ आणि रेणापूर तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतीची इमारत नाही.
इमारतीसाठी पाठपुरावा...
गावात ग्रामपंचायतीची इमारत आहे. मात्र, ती फार जुनी आहे. त्यामुळे मोडकळीस आली आहे. काही वेळेस छताचा गिलावा गळत आहे तर भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीत बसण्यासाठीही भीती वाटत आहे. नवीन इमारत बांधण्यात यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.
लवकरच अडचण दूर...
आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच १५ व्या वित्त आयोेगातूनही काही इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अडचण दूर होईल.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.
निलंग्यातील सर्वाधिक इमारती जीर्ण...
तालुका - ग्रामपंचायती - जीर्ण इमारती
लातूर - १११ - २४
औसा - १०९- २६
निलंगा - ११६ - २७
शिरुर अनं.- ४२ - ०९
देवणी - ४५ - ११
उदगीर- ८७ - १८
जळकोट - ४३ - ०८
अहमदपूर - ९७ - १९
चाकूर - ७१ - १४
रेणापूर - ६५ - १६
एकूण - ७८६ - १७२