लातूरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या
By हरी मोकाशे | Published: February 28, 2024 06:55 PM2024-02-28T18:55:24+5:302024-02-28T18:56:04+5:30
कर्मचाऱ्यांचे काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लातूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरु होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यात यावे. वेतन अनुदानासाठी लागू केलेली वसुलीची अट रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु होते. यावेळी जोरदार घोषणा देत जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस दयानंद येरंडे, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ नरवडे, जिल्हाध्यक्ष सतीश मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद लोभे, काशिनाथ कुसनुरे, सचिव किशोर मस्ने, सहसचिव मंगेश जाधव, कार्याध्यक्ष नंदकुमार माने, रंजित दोडके, अमोल गायकवाड, लक्ष्मण ठाकूर, हाजुद्दीन शेख, जिलानी शेख, अण्णाराव कांबळे, ज्ञानोबा कांबळे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनास देण्यात आले.