ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By संदीप शिंदे | Published: December 20, 2023 06:30 PM2023-12-20T18:30:08+5:302023-12-20T18:30:15+5:30
कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
निलंगा : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले असून, पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येत आहे.
निलंगा तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून, यामध्ये २३७ कर्मचारी आहेत. मात्र, त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्ती वेतन लागू करावे, उपदान लागू करावे, भविष्य निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना या कार्यालयात जमा करावी, सुधारित किमान वेतन लागू करणे, वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर सतीश म्हस्के, परमेश्वर लोभे, नागेश नलमले, प्रताप शिडे, प्रशांत बाबळसुरे, गंगाधर घोरपडे, कालिंदा वाघमारे, अंजीरबाई रेड्डी, निलाबाई सुरवसे, प्रकाश घोरपडे, अविनाश गायकवाड, आदींसह आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.