५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात ! किनगावात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2025 21:51 IST2025-01-13T21:51:22+5:302025-01-13T21:51:46+5:30
कर्ज नाेंदीसाठी लाचेची मागणी...

५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात ! किनगावात गुन्हा
राजकुमार जाेंधळे / लातूर : बँकेच्या १५ लाखांच्या कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रायवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामसेवकास साेमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निवृत्ती तुकाराम आलापुरे (वय ३६, ह.मु. रा. सारोळा रोड, लातूर) हा सध्या चाकूर तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, एका ५७ वर्षीय तक्रारदाराने पत्नीच्या नावे असलेले राहते घर तारण ठेवून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून १५ लाखांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची नाेंद स्थावर मालमत्तेवर घेण्याच्या कामासाठी ग्रामसेवक निवृत्ती आलापुरे याने पहिल्यांदा ७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती ६ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. यामधील एक हजार रुपये यापूर्वीच स्विकारले असून, उर्वरित ५ हजार ५०० रुपयांची लाच साेमवारी देण्याचे ठरले हाेते.
दरम्यान, लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने साेमवारी कार्यालयातच सापळा लावला. ग्रामसेवक आलापुरे याने तक्रारदाराकडून प्रलंबित कामासाठी ५ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून, ती रक्कम स्विकारण्याचे मान्य केले आणि लाचेची रक्कम शासकीय कार्यालयात स्वीकारली. यावेळी लातूर येथील एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून अटक केली. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लातूर येथील एसीबीचे पाेलिस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी दिली.