आजोबा 105 तर आज्जीचं वय 95 वर्षे, वृद्ध चव्हाण दाम्पत्यांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 04:21 PM2021-04-25T16:21:59+5:302021-04-25T16:22:45+5:30
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे.
मुंबई - देशात कोरोना महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातक कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, 22 एप्रिलपासून राज्यात एकप्रकारे लॉकडाऊनच जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून कोरोनाचा मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी, सकारात्मक बातमी आहे. 105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीनें कोरोनावर मात केलीय.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांग लागल्याचंही आपण पाहिलं. दुसरीकडे सोशल मीडियावरही भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पडत आहेत. मात्र, या नेगेटीव्ह वातावरणातही रुग्णाचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं मनोबल वाढविणारी एखादी माहिती समोर येते. लातूर जिल्ह्यातील चव्हाण दाम्पत्यांची कथा अशीच म्हणावी लागेल.
माझ्या मतदारसंघातील काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन आज कोरोनावर मात केली. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. pic.twitter.com/L1lXhIPh2w
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) April 24, 2021
लातूर ग्रामीणच्या काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या आजी-आजोबाचा फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी दिली. सध्याच्या वातावरण कोरोना रुग्णांना धीर देणारी, त्यांचं मनोधैर्य वाढवणारी ही बातमी आहे. धीरज देशमुख यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिलीय.
दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असल्याने सोशल मीडिया आणि टेलिव्हीजनवरच अनेकांचा वेळ जात आहे. त्यातच, रुग्णालयातील विदारक दृश्य पाहून वेदना आणि दु:ख याशिवाय काहीच हाती लागत नाही. त्यामुळे, या आजी-आजोबाने कोरोनावर मात करुन कोरोनातून आपणही बरे होऊ शकतो, हाच मंत्र दिलाय, असेच म्हणावे लागेल.