मराठवाडा, विदर्भाच्या विकासात निलंगेकराचं मोठे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:39 AM2020-08-06T05:39:43+5:302020-08-06T05:41:12+5:30
श्रद्धांजली । शिवाजीराव पाटील निलंगेकर
लातूर : मुख्यमंत्री तसेच मंत्री असताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ते स्वातंत्र्यसेनानी होते. मराठवाडा, विदर्भ विकासाची त्यांनी पायाभरणी केली. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४२ कलमी, विदर्भासाठी ३३ कलमी तर कोकण विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम राबविला. रोजगार हमीवरच्या मजुरांना मजुरीशिवाय दररोज धान्य देण्याची क्रांतिकारी योजना त्यांनी राबविली. तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय डॉ. निलंगेकर यांचाच होता. लोकन्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरण, मागासवर्गीय वस्त्यांचे विद्युतीकरण यासह राज्यातील १० जिल्हा व तालुका न्यायालयांच्या इमारतीचे काम त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले. शिक्षणसंस्थांचे जाळे निर्माण केले. गुणवत्तेवर नियुक्त्या आणि शासनमान्य शुल्कावरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा पायंडा निर्माण केला.
लातूर येथील जवाहर सहकारी सूतगिरणीचे ते संस्थापक होते. लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीत, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे राहिले. औरंगाबाद महापालिका, नव्या विधानसभेची इमारत हे त्यांच्याच निर्णयाचे फलित आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रात दीर्घकाळ परिणाम करणारे काम केले. मोठ्या व लघु प्रकल्पांची उभारणी केली. लोअर तेरणा, उजनी, सिंदफणा, कुकडी, कृष्णा, मांजरा, डिग्वे, अप्परवर्धा, धनेगाव, मदनसुरीसह अनेक लघु प्रकल्प साकारले.
एक हृद्य आठवण
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लोकमत परिवाराशी खूप जिव्हाळ्याचे नाते होते. ते मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमप्रसंगी टिपलेल्या छायाचित्रात त्यांच्या समवेत तत्कालीन मंत्री स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा
राजकीय
कारकीर्द
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी १९६२ पासून सातत्याने निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नऊवेळा विधानसभेवर तर एकदा विधान परिषदेवर निवडून गेले.
असे एकूण ते ४१ वर्षे विधिमंडळात राहिले. ३ जून १९८५ ते ७ मार्च १९८६ या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री तर १९९२ मध्ये ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्याच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ अनेक खात्यांचा पदभार सांभाळला. प्रामुख्याने गृह, महसूल, आरोग्य, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे काम पाहताना जनहिताचे निर्णय घेतले.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक लोकाभिमुख नेता गमावला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी, गरीब व कष्टकऱ्यांसाठी डॉ. निलंगेकर यांनी पथदर्शी काम केले.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
स्वातंत्र्य लढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाºया नेतृत्वात ज्येष्ठ नेते डॉ. निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाºया डॉ. शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री