लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:50 IST2025-04-07T11:49:57+5:302025-04-07T11:50:41+5:30

महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी का झाडून घेतली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

Green corridor in Latur! Commissioner Babasaheb Manohare who shot himself airlifted to Mumbai | लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं

लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं

लातूर : स्वतः वर गोळी झाडून घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेले महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यावर रविवारी पहाटे तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, अधिक उपचारांसाठी आयुक्त मनोहरे यांना आज सकाळी एयरलिफ्ट करून मुंबईला हलविण्यात आले. यासाठी शहरात साडेदहा वाजेच्या दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटल ते एयरपोर्ट दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.

आयुक्त मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी स्वत:च्या डोक्यात बंदुकीने गोळी झाडली होती. उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी डाव्या दिशेने आरपार गेली. घटनेच्या वेळी पत्नी, दोन लहान मुले, सुरक्षा रक्षक घरात होते. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक, कुटुंबीयांनी धाव घेतली. आयुक्तांच्या पत्नीने वसमत येथे सासऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ चालक हकानी शेख यांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. अगदी पंधरा ते वीस मिनिटांत आयुक्तांना जखमी अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी का झाडून घेतली, याचे कारण अद्यापि पोलिस दप्तरी नोंदविलेले नाही. पोलिस कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कवटीचे फ्रॅक्चर; शस्त्रक्रिया यशस्वी
आयुक्त मनोहरे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्यामुळे उजव्या, डाव्या बाजूने कवटीतून रक्तस्राव होत होता. रविवारी पहाटे २ ते सकाळी ५:३० अशी साडेतीन तास शस्त्रक्रिया झाली. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

डोळे उघडले, उजवा हात उचलला...
शस्त्रक्रियेनंतर आयुक्तांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते डोळे उघडा म्हटले तर डोळे उघडत आहेत. उजवा हात व्यवस्थित उचलत आहेत. उजव्या हातांची हालचाल करा असे सांगितल्यानंतर ते करीत आहेत. डाव्या बाजूची हालचाल कमी आहे, असे न्यूरोसर्जन डॉ. हनुमंत किणीकर म्हणाले.

Web Title: Green corridor in Latur! Commissioner Babasaheb Manohare who shot himself airlifted to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.