जिजामाता विद्यालयात अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:29+5:302021-01-14T04:16:29+5:30
रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याची मागणी लातूर : शहरातील अनेक भागांंत बांधकामे सुरू आहेत. मनपाच्या वतीने बांधकाम परवाना दिला असला, ...
रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याची मागणी
लातूर : शहरातील अनेक भागांंत बांधकामे सुरू आहेत. मनपाच्या वतीने बांधकाम परवाना दिला असला, तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहर महापालिकेने रस्त्यावरील बांधकाम साहित्य इतरत्र ठेवण्यासंदर्भात सूचना करण्याची मागणी होत आहे.
समांतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेकांनी रस्ता खोदून पाइपलाइन नेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
विवेकानंद चौक येथे जयंती साजरी
लातूर : शहरातील विवेकानंद चौक येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुधाकर घारापूरकर, प्रा. प्रीती पोहेकर, बसवराज पैके, संजय पांडे, डॉ. राजेश पाटील, संजय अयाचित, सुरेश पाटील आदींसह जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी दिव्यांग बांधवांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्त्री रुग्णालय परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील स्त्री रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. या रुग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे दवाखान्यात आलेल्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूला कचरा टाकला जात आहे, याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
उसात हरभऱ्याचा आंतरपीक प्रयोग
लातूर : जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात हरभऱ्याचे आंतरपीक घेतले आहे. लातूर तालुक्यातील सारसा, तांदुळजा, साई, जेवळी, नागझरी आदी भागांत आंतरपीक घेतले असल्याचे चित्र आहे. जवळपास ६०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हा प्रयोग राबविण्यात आला असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कौशल्य विकास विभागाकडे बेरोजगारांची नोंदणी
लातूर : जिल्हा कौशल्य विभागाकडे गत वर्षात एक लाख ५० हजार बेरोजगारांनी नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत देण्यात आली. उद्योजक आणि व्यावसायिकांनी या नोंदणीकृत बेरोजगारांना परस्पर समन्वय ठेवून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा बैठकीत केल्या. यावेळी उद्योग संघटना तसेच एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
रयतू बाजार परिसरात उघड्यावर कचरा
लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी, विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक व्यापारी उरलेला भाजीपाला या परिसरात फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नियमित कचरा संकलन करून कचरा फेकणा-यांंवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
लातूर : शहरापासून कळंबकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्त्याच्या डागडुजीसाठी संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
मनपाच्या वतीने रस्त्यांची स्वच्छता
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने रात्रीच्या वेळी मुख्य चौकातील रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत गंजगोलाई, बार्शी रोड, अंबेजोगाई रोड, रेणापूरनाका, गांधी चौक, बाजार समिती परिसरात असलेले रस्ते, औसा रोड आदी भागांंंत साफसफाई केली जात आहे. तसेच संकलित केलेला कचरा ट्रॅक्टर किंवा घंटागाडीद्वारे उचलला जात असल्याचे चित्र आहे. या मोहिमेसाठी मनपाच्या वतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दररोज दीड हजार चाचण्या
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी आरोग्य विभागाच्या वतीने दीड हजार चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये प्रयोगशाळेतील चाचण्या व रॅपिड ॲण्टीजेन चाचण्यांचा समावेश आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. सध्या ३२४ जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी १८३ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.