मैदान दुरुस्तीचा बसेना मेळ; खेळाडूंच्या सरावाचा होतोय खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:06 PM2023-06-24T20:06:30+5:302023-06-24T20:06:48+5:30
लातूरच्या क्रीडा संकुलातील व्हॉलीबॉलच्या मैदानाची दुरुस्ती रखडली
- महेश पाळणे
लातूर : जिल्ह्यात क्रमांक एकचा खेळ असलेल्या व्हॉलीबाॅलने अनेक दिग्गज व्हॉलीबॉलपटू दिले आहेत. या खेळाची जिल्ह्यात परंपरा आहे. मात्र, या खेळालाच सध्या घरघर लागली आहे. क्रीडा संकुलात असलेल्या व्हॉलीबॉलच्या मैदानाची दुरुस्ती पावणेदोन महिन्यांपासून रखडली आहे. प्रशासनालाही मैदान दुरुस्तीचा मेळ बसत नसल्याने खेळाडूंच्या सरावाचा मात्र खेळ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा क्रीडा संकुलातील व्हॉलीबॉल मैदानाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी ७ लाख मंजूर झाले. मात्र, पावणेदोन महिने उलटले तरी अद्यापही काम अपूर्णच आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावाला खीळ बसली आहे. शालेय व विद्यापीठ स्पर्धेचा हंगाम काही दिवसांवरच येऊन ठेपला असल्याने खेळाडूंना सरावाची गरज आहे. मात्र, संकुलातील मैदान दुरुस्त नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. काही खेळाडू इतर मैदानाचा आधार घेत आहेत, तर काहींचा सरावच बंद आहे. मात्र, याचे क्रीडा विभागाला काही देणे- घेणे नाही.
संकुलातील व्हॉलीबॉल मैदानावर सकाळ- सायंकाळच्या सत्रात ५ ते ६ मुला- मुलींच्या क्लबच्या माध्यमातून शेकडो खेळाडू नित्यनियमाने सराव करतात. मैदान दुरुस्तीअभावी सध्या हा सराव बंद आहे. काही महिला खेळाडू या ठिकाणीच हलकासा वॉर्मअप करुन घराकडे परतत आहेत. एकंदरित, मैदान दुरुस्ती रखडल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.
नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न...
दोन वर्षांपूर्वीच व्हॉलीबॉल मैदान दुरुस्तीसाठी १० लाख मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. यात मैदान दुरुस्तीसह क्रीडा साहित्याची खोली, खेळाडूंना बसण्यासाठी छोटी गॅलरी, पोल बदलणे, ड्रेनेज सिस्टीम आदी कामांचा समावेश होता. मात्र, आता यात कमी करीत ७ लाख मंजूर झाले असून तेही काम वेळेवर होत नसल्याने नकटीच्या लग्नात सतराशेसाठ विघ्न म्हणण्याची वेळ खेळाडूंवर आली आहे.
शासनाच्या स्पर्धेला व्हॉलिबॉल पटूंनीच केले होते सहकार्य...
फेब्रुवारीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातूरने केले होते. या स्पर्धेसाठी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडूंनीच दिवसरात्र मेहनत करीत या स्पर्धा यशस्वी केल्या होत्या. मैदानाचे परिपूर्ण काम खेळाडूंच्या मदतीनेच झाले होते. मात्र, आता याच खेळाडूंना मदत करण्यासाठी क्रीडा विभाग हात आखडता घेत आहे.
तिघांचा ताळमेळ लागेना...
दुरुस्तीसाठी क्रीडा विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम वर्ग केले आहे. त्यानुसार गुत्तेदार हे काम करीत आहेत. मात्र, या तिघांत ताळमेळ नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे.
पालकमंत्रीच आहेत क्रीडा मंत्री...
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे क्रीडामंत्री असून त्यांच्या या जिल्ह्यात क्रीडा विभागाची ही अवस्था आहे. खेळाडूंनाही त्यामुळे आशा आहे. मात्र, सध्या निराशा होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे गरजेचे आहे.
लवकरच काम पूर्ण...
याबाबत संबंधितांना सूचना केल्या असून लवकरच व्हॉलीबॉल मैदानाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यामुळे खेळाडूंची अडचण दूर होईल.
- जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडाधिकारी.