लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!
By हरी मोकाशे | Updated: March 22, 2024 17:01 IST2024-03-22T17:01:02+5:302024-03-22T17:01:58+5:30
१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट

लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!
लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी २.१३ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहण होत आहे.
गत पावसाळ्यात जिल्ह्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या वाहिल्या नाही तर ओढे खळाळले नाहीत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही अपेक्षित जलसाठा झाला नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे परतीच्या पावसावर आशा होती. मात्र, ती फोल ठरली.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अधिक गहण हाेत आहे.
नऊ तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...
तालुका - पाणी पातळीतील घट मीटरमध्ये
अहमदपूर - -२.७४
औसा - -३.३०
चाकूर - -२.४१
देवणी - ०.११
जळकोट - -१.७७
लातूर - -०.३२
निलंगा - -२.७६
रेणापूर - -२.७१
शिरुर अनं. - -४.६०
उदगीर - -०.७९
एकूण - -२.१३
शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...
भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षीच्या मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -२.१३ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली असून ती -४.६० मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्याची कमी झाली आहे. -३.३० मीटर अशी घट झाली आहे.
देवणी तालुक्याची स्थिती समाधानकारक...
जिल्ह्यातील दहापैकी नऊ तालुक्यांची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. केवळ देवणी तालुक्यातील पाणीपातळी समाधानकारक असून ती ०.११ मीटर अशी आहे. त्यामुळे पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.
१८९ गावे तहानली, पाणीपुरवठ्याची मागणी...
सध्या जिल्ह्यातील १५६ गावे आणि ३३ वाड्या तहानलेल्या आहेत. या एकूण १८९ गावांनी अधिग्रहणासाठी २६१ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणीअंती १८ गावांचे २९ प्रस्ताव वगळले आहेत. दरम्यान, १२६ गावांचे १६२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ४८ गावांचे ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
१६ गावांचे टँकरचे प्रस्ताव...
जिल्ह्यातील १४ गावे आणि २ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्त्रोत काेरडे पडल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. लामजना, खरोसा, टेंभूर्णी या तीन गावांसाठी तीन टँकर मंजूर करण्यात येऊन तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.