क्रीडा मार्गदर्शकांअभावी प्रशिक्षण केंद्रातील मैदाने रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:53 PM2019-12-16T18:53:16+5:302019-12-16T18:55:47+5:30
प्रशिक्षक चार महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत
- महेश पाळणे
लातूर : राज्यातील उद्योन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने अमलात येणारी क्रीडा मार्गदर्शकांची भरती प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून रखडली आहे़ परिणामी, राज्यातील क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षण केंद्रे ओसाड पडली आहेत़ त्यामुळे राज्यातील प्रशिक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत़
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने २३ आॅगस्ट २०१९ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील क्रीडा मार्गदर्शकांची पदे बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनेचे परिपत्रक काढण्यात आले होते़ मात्र याला चार महिने उलटून गेले तरी भरती प्रक्रिया अद्यापी झाली नाही़ नवोदित खेळाडूंना आॅलम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या कामी क्रीडा मार्गदर्शकांची भूमिका महत्त्वाची असते़ या दृष्टीने १५३ मार्गदर्शकांच्या पदापैकी ११० क्रीडा मार्गदर्शकांची पदे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती़ मान्यता देऊनही बराच कालावधी झाला तरी अद्यापी नियुक्ती झाली नाही़ त्यामुळे राज्यातील खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे़ यापूर्वीही अनेकदा मानधन तत्त्वावर क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली होती़ मात्र त्यात सातत्य नसल्याने शासनाचा खेळाडू घडविण्याच्या मनसुब्याला हरताळ फासली गेली़ मानधन तत्वावरील क्रीडा मार्गदर्शकांना आजपर्यंत तीन ते चार वेळेस सेवेतून खंड पाडीत नियुक्त्या दिल्या आहेत़ त्यामुळे सातत्य राहिले नाही़ परिणामी, खेळाडू घडविण्याच्या उद्दिष्टाला अडचण निर्माण झाली आहे़
उपसंचालकांना अधिकाऱ
क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्याबाबत विभागीय क्रीडा उपसंचालकांना अधिकार देण्यात आले आहेत़ आपल्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात प्रचलित तीन खेळासाठी क्रीडा मार्गदर्शक देण्यात येणार आहेत़ विभागातील त्या-त्या जिल्ह्याच्या नियुक्त्या उपसंचालकांनी कराव्यात, असे मुख्य कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे़ मुख्य कार्यालयातून नियुक्ती करावी, का उपसंचालकांमार्फत करावी यामुळे ही भरती प्रक्रिया रखडल्याचेही समजते़
तीन वेळा स्मरणपत्ऱ
प्रत्येक जिल्ह्यातून तीन खेळांची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती़ जिल्ह्यात चालणाºया खेळाची माहिती व खेळ निवडण्याचे अधिकार डीएसओंना देण्यात आली होती़ मात्र राज्यातील मोजक्या जिल्ह्यांनीच याची माहिती मुख्य कार्यालयाला पाठविली होती़ याबाबीसाठी मुख्यालयाने जवळपास तीन वेळा स्मरणपत्र दिले आहे़
१०० गुणांचे मुल्यांकन
क्रीडा मार्गदर्शकांच्या निवड प्रक्रियेसाठी १०० गुणांचे मुल्यांकन ठरविण्यात आले आहे़ यात खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी ७५ गुण तर शैक्षणिक अर्हतेसाठी २५ गुण़ कौशल्य चाचणीसाठी प्रशिक्षण कौशल्य ५० गुण, वैयक्तिक कौशल्य १५ गुण व वैयक्तिक फिटनेससाठी १० गुण ठेवण्यात आले आहेत़
लवकरच नियुक्ती
याबाबत राज्यातील विभागीय क्रीडा उपसंचालकांना क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीबाबत पत्राद्वारे सुचविण्यात येणार असून, लवकरच त्यांना नियुक्त्या देण्यात येतील असे, पुणे येथील मुुख्य कार्यालयातील उपसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले़