लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

By हणमंत गायकवाड | Published: August 31, 2023 07:51 PM2023-08-31T19:51:07+5:302023-08-31T19:51:22+5:30

उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पंचवीस टक्के अग्रीम वितरणाच्या सूचना

Growth of crops stunted in 31 revenue circles of Latur district! | लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगाम धोक्यात आला असला तरी पर्जन्यमापकात ६० पैकी ३१ महसूल मंडळांतच २१ पेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस पडला नसल्याची नोंद आहे. तर २९ महसूल मंडळांत अधूनमधून पाऊस पडला आहे. या पावसाची नोंद पर्जन्यमापकात झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी दिली. पावसाच्या या असंतोलपणामुळे ६० महसूल मंडळांपैकी ३१ महसूल मंडळांतील पीकवाढीवर जास्त परिणाम झाला आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

खरीप हंगामातील पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पीकविमा कंपनीला २५% अग्रीम वितरणाच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आल्यास पंचवीस टक्के अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत विमा कंपन्याला कळविले जाणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र पिके धोक्यात; माना टाकल्या...
२१ दिवस नव्हे महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही : एक-दोन थेंबांच्या सरी काही महसूल मंडळांत पडल्यामुळे फक्त ३१ महसूल मंडळातच दिवसांपेक्षा जास्त खंड दर्शविला जात आहे. वास्तवात जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीन माना टाकत आहेत. हलक्या जमिनीवर तर पीक पिवळे पडले आहे. मध्यम व भारी जमिनीवरील ठिकाणी थोडा तग धरला आहे. एक-दोन दिवसांत पाऊस नाही पडल्यास पिके करपणार आहेत, हे वास्तव आहे.

साठही महसूल मंडळांत सर्वेक्षण करणार...
जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांमध्ये पीक परिस्थितीची पाहणी केली जात आहे. जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले जात आहे. सुरुवातीला ३१ महसूल मंडळांत. त्यानंतर उर्वरित २९ महसूल मंडळांत सर्वेक्षण होणार आहे. उत्पादनात घट आढळल्यानंतर २५% अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत पीकविमा कंपन्यांना कळविले जाईल. पर्जन्यमापकात झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार ३१ महसूल मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा खंड आहे.
- एस.व्ही.लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

Web Title: Growth of crops stunted in 31 revenue circles of Latur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.