पोलिसांच्या पाठलागात कार उलटली अन् सापडला गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:13+5:302021-09-03T04:21:13+5:30
पोलिसांनी सांगितले की, किल्लारी ठाण्याचे सपोनि. सुनील गायकवाड, पोना. धनंजय कांबळे, हवालदार किसन मरडे, पोकॉ. आबासाहेब इंगळे व चालक ...
पोलिसांनी सांगितले की, किल्लारी ठाण्याचे सपोनि. सुनील गायकवाड, पोना. धनंजय कांबळे, हवालदार किसन मरडे, पोकॉ. आबासाहेब इंगळे व चालक डिगंबर शिंदे हे बुधवारी पहाटे पॅट्रोलिंग करीत होते. तेव्हा गुबाळ चौकातून भरधाव वेगात कार (एमएच १२, ईएम ६५७६) जात असल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी सास्तूरहून हसगण रस्त्याकडे जाणाऱ्या या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून कारचालकाने आणखीन वेग वाढविला. दरम्यान, गुबाळपासून १५ किमी अंतरावर अचानकपणे कार उलटली आणि काही मिनिटांत पोलीस तिथे दाखल झाले. पोलिसांनी चालक रहिम अजमजोद्दीन शेख (रा. गुबाळ, ता. औसा) यास कारमधून बाहेर काढले. तेव्हा त्यास मुक्का मार लागल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने वाहनात गुटखा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. हा गुटखा जप्त केला. त्याची किंमत ८७ हजार ३६० रुपये आहे. तसेच कार जप्त केली असून त्याची किंमत १ लाख २० हजार आहे.
सपोनि. सुनील गायकवाड यांनी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे, एन.टी. मुजावर यांना माहिती दिली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मुजावर यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.