महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ५२ लाखांचा गुटखा पकडला
By राजकुमार जोंधळे | Published: March 6, 2024 08:36 PM2024-03-06T20:36:54+5:302024-03-06T20:37:04+5:30
एकाला अटक : औराद पोलिसांची कारवाई.
लातूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीत कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने लाखाे रुपयांचा गुटखा आणण्यात येणारे वाहन औराद शहाजानी ठाण्याच्या पाेलिस पथकाने बुधवारी पकडले. यावेळी तब्बल ३७ लाखांचा गुटखा, टेम्पाे वाहन असा एकूण ५२ लाखांचा मुद्देमालासह एकाला अटक केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. बुधवारी कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने आणण्यात येणारा गुटखा वाहन तपासणीमध्ये पाेलिसांच्या हाती लागला. टेम्पाेची झाडाझडती घेतली असता सुगंधीत सुपारी, पावडर असा मुद्देमाल आढळून आला. यावेळी अब्दुल ताैसीफ (रा. आदिलाबाद, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातून गुटखा १४० बॅग चाेरट्या मार्गाने ताे महाराष्ट्रात आणत हाेता. यावेळी गुटखा आणि टेम्पाेसह एकूण ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई औराद शहाजानी ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे, पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे, कर्मचारी माेसीनअली शेख, प्रणव काळे, भाले, अंतरेड्डी यांच्यासह हाेमगार्डच्या पथकाने केली.