उदगीर, मुरुड येथे पोलिसांच्या धाडीत सव्वा काेटींचा गुटखा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: August 13, 2024 03:23 PM2024-08-13T15:23:25+5:302024-08-13T15:24:11+5:30
लातूर पाेलिसाची कारवाई : सात जणांविरुद्ध गुन्हा
लातूर : जिल्ह्यातील उदगीर, मुरुड येथे साेमवारी विशेष पाेलिस पथकाने धाडी टाकल्या. यावेळी तब्बल १ काेटी २४ लाख ८८ हजारांचा गुटखा, वाहने जप्त केली आहेत. याबाबत उदगीर मुरुड पाेलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याचे आदेश पाेलिस अधीक्ष सोमय मुंडे यांनी दिले असून, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले यांच्या पथकाने अवैध व्यवसायाची माहिती मिळविली. मुरुड येथे माेठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची पडताळणी करुन स्थागुशाच्या पथकाने साेमवारी सकाळी मुरुड येथील गुट्टे नगरात दोन ठिकाणी घरावर छापा मारला. यावेळी गुटखा, सुगंधित पानमसाला असा ६६ लाख ४० हजार १०१ रुपयांचा, दुसऱ्या ठिकाणी ५३ लाख ३२ हजार २४० असा एकूण १ कोटी १९ लाख ७२ हजार ३४१ रुपयांचा गुटखा, चारचाकी वाहन जप्त केले आहे. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात अनिल वसंत कापसे, विशाल गुट्टे, संदिपान बाबुराव विटेकर, बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया आणि भैरू नरसू गुट्टे ( सर्व रा. मुरुड) यांच्याविराेधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.
उदगीरात दुसऱ्या दिवशी गुटखा जप्त...
उदगीर येथील पाेलिसांनी दुसऱ्या दिवशीही गुटखा पकडला आहे. कर्नाटकातून नांदेड जिल्ह्यात वाहतूक करण्यात येणारा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा गुटखा, चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख १६ हजार २०८ रुपयांचा मुद्देमाल साेमवारी पहाटे जप्त केला आहे. उदगीरमधील बिदर मार्गावर कमानीनजीक कारमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, कारसह गुटखा पाेलिसांनी पकडला. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात माधव गणपती अभंगे, मारोती दिंगाबर अभंगे (दोघेही रा. मंगनाळी पो. पेठवडज ता. कंधार जि. नांदेड) यांच्याविराेधात गुन्हा नोंद केला आहे.