किराणा दुकानांवर छाप्यात तीन लाखांचा गुटखा जप्त; दाेघांविराेधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: February 1, 2023 06:15 PM2023-02-01T18:15:19+5:302023-02-01T18:16:18+5:30
, निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे पोलिसांचा छापा
लातूर : राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा किराणा दुकानातून विक्री करणाऱ्या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून एकूण दोन लाख ९८ हजार ९३० रुपयांचा गुटखा मंगळवारी जप्त केला. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात दाेघा किराणा दुकानदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे माेठ्या प्रमाणावर पानटपरी, हाॅटेल्स आणि गल्लीतील किराणा दुकानांतूनही प्रतिबंधित असलेला गुटखा खुलेआमपणे विक्री केला जात असल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधारे लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी दाेन किराणा दुकानांवर ३१ जानेवारी राेजी छापे टाकले. पहिला छापा ए-वन किराणा स्टाेअर्सवर टाकण्यात आला असून, बाबू वाहेरअली तांबाेळी (वय ६०, रा. कासार शिरसी, ता. निलंगा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विविध कंपन्यांचा सुगंधी पानमसाला, गुटखा असे एकूण एक लाख ८२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पाेलिस हेडकाॅन्स्टेबल अंगद काेतवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.
बिनदिक्कत गुटखा विक्री...
दुसरा छापा कासार शिरसी येथील काेराळी राेडवर असलेल्या स्वप्निल किराणा स्टाेअर्सवर टाकला. यावेळी प्रकाश शिवदास डाेणगावे (वय ५०, रा. काेराळी, ता. निलंगा) हा राज्य शासनाने बंदी घातलेला सुगंधी पानमसाला, गुटखा विक्री करत हाेता. दरम्यान, यावेळी एक लाख १६ हजार ७६० रुपयांचा गुटखा व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत स्थागुशाचे माधव बिलापट्टे यांच्या तक्रारीवरून कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.