उदगीर, जळकोटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; द्राक्ष, आंब्याचे नुकसान

By हरी मोकाशे | Published: April 27, 2023 04:00 PM2023-04-27T16:00:13+5:302023-04-27T16:01:29+5:30

पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांत व्यत्यय आला आहे.

hailstorm in Udgir, Jalkot taluka | उदगीर, जळकोटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; द्राक्ष, आंब्याचे नुकसान

उदगीर, जळकोटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; द्राक्ष, आंब्याचे नुकसान

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील उदगीरसह तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात गारांचा अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडून गेली. तसेच झाडेही उन्मळून पडली.

वादळी वाऱ्यामुळे माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयासमोरील संदीप कासले व अन्य काहींच्या वाहनांवर झाड उन्मळून पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. तसेच विजेच्या तारा तुटल्यामुळे शहरातील वीज गुल झाली. या पावसामुळे द्राक्ष, आंब्याचे नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांत व्यत्यय आला आहे. झाडांच्या फांद्या रस्त्यावर तुटून पडल्यामुळे उदगीरातील रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद पडली होती.

तसेच जळकोट तालुक्यात गारांचा पाऊस झाला. जवळपास तासभर पाऊस झाला. दरम्यान, गुरुवारी पहाटेच्या सुमारास सिंदगी येथील केशव पाटील यांच्या दोन म्हशींवर वीज पडल्याने त्या दगावल्या. तसेच निलंगा तालुक्यातील हालसी तुगाव येथील मंदिरावर वीज कोसळली. त्यामुळे मंदिराच्या भिंतीस तडे गेले आहेत. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी, येरोळ, डिगोळ येथे गारा पडल्या आहेत. निलंग्यात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. सह चार विद्युत उपकेंद्राचा १४ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: hailstorm in Udgir, Jalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.